News Flash

आठवणींचा ‘कथा’पट..

हुशारीचे किंबहुना सर्जनशीलतेचे बाळकडू जणू सई यांना घरातूनच मिळाले होते.

ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपेंशी भेट

‘लोकसत्ता गप्पा’च्या नव्या पर्वात ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपेंशी भेट

मुंबई : रंगभूमी, दूरचित्रवाणी ते चित्रपट असा मोठा पट रंगवणाऱ्या, मोठय़ांच्या मनावर गारूड करून मग लहानांनाही आपलेसे करणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांच्याशी गप्पा मारण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पा’च्या नव्या पर्वात मिळणार आहे. या गप्पांतून रसिकांच्या मनावर भावसंस्कार करणाऱ्या एका लेखिका आणि दिग्दर्शिकेच्या जीवनाचा ‘कथा’पटच उलगडणार आहे.

आजीबाईच्या पोटलीतील गोष्टी कधी संपत नाहीत तशी काहीशी अवस्था कलंदर व्यक्तिमत्वांच्या बाबतीत होते. त्यांनी जगलेले क्षण न् क्षण, त्यांचे रसरशीत अनुभव, चांदण्या रात्रीतली शीतलता नाहीतर रणरणत्या उन्हातले चटके.. जे येईल ते तितक्याच सहजतेने, प्रगल्भतेने झेलणाऱ्या या कलाकारांचा अवघा देह बोलका व्हावा आणि ते शब्द आपण आतूरतेने झेलावेत, अशी भावावस्था क्वचितच वाटय़ाला येते. तो अनुभव या गप्पांतून गवसणार आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांच्या आठवणींची ‘सय’ पुन्हा एकदा रसिकांसमोर उलगडणार आहे.

हुशारीचे किंबहुना सर्जनशीलतेचे बाळकडू जणू सई यांना घरातूनच मिळाले होते. वडील चित्रकार आणि आई अभिनेत्री असल्याने क ला वारसाहक्काने त्यांच्याकडे आली आहे. मात्र कलागुण नुसते उपजत असून भागत नाही, त्यांना पैलू पाडावेच लागतात. सई परांजपे यांनी शिक्षणातून, लहानपणापासून भेटलेल्या माणसांमधून, अनुभवांमधून जे जे मिळाले ते सारे आत्मसात करत आपल्या सर्जनशीलतेचे शिंपण करून त्याची अभिव्यक्ती वेगवेगळ्या माध्यमांतून केली. मग कधी ती नाटकांमधून उतरली तर कधी चित्रपटांमधून.. तर कधी साहित्यातून. त्यांच्या या कलाप्रवासातील आठवणी त्यांच्याच शब्दांत ऐकण्याची संधी १९ ऑगस्टला होणाऱ्या लोकसत्ता आयोजित, ‘के सरी’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून मिळणार आहे.

सई परांजपे नाव घेतले तरी सहजच ‘स्पर्श’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’ सारख्या चित्रपटांची नावे ओठावर येतात. आणि त्याबरोबरीने त्यांनी या चित्रपटातून मांडलेल्या कथा, त्यांचे कलाकार, त्यांच्या चित्रपटांनी मुख्य चित्रपटाच्या प्रवाहात राहूनही निर्माण केलेला वेगळा ठसा अशा अनेक गोष्टी एकापाठोपाठ एक मनात रूंजी घालतात.काळाच्या पुढच्या कथावस्तूचा वेध घेणारे ‘जास्वंदी’सारखे नाटक असो की ‘सख्खे शेजारी’सारखे खुसखुशीत नाटक असो, रंगभूमीवरही सई नामाचा ठसा उमटलाच.

एक दिग्दर्शिका म्हणून त्यांनी केवळ उत्तम चित्रपट दिले असे नाही. तर नसीरूद्दिन शाह, ओम पुरी, दीप्ती नवल यांच्यासारखे कलाकारही त्यांनी घडवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खुद्द नसीरही, सई परांजपे यांनी ‘स्पर्श’ चित्रपटात आपल्याला जी भूमिका देऊ केली त्यामुळे आपली कारकिर्द बहरली अशी कृतज्ञ कबुली देतात. सत्तरच्या दशकापासून आत्तापर्यंतच्या अनुभवांची भलीमोठी शिदोरी सई परांजपे यांच्याकडे आहे. यात रंगभूमीवरचा प्रवास असो, दूरदर्शनच्या जडणघडणीचा काळ असो किंवा हिंदीत समांतर चित्रपटांच्या चळवळीत आपल्या स्वतंत्र शैलीने उमटवलेला ठसा असो; या सर्वामागची त्यांची प्रेरणा, त्यांचे विचार यांचा मागोवा थेट त्यांच्याचकडून ऐकण्यासाठी सई परांजपे नामक प्रतिभेशी होणारी ही भेट आणि रंगणाऱ्या गप्पा महत्वाच्या ठरणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 3:15 am

Web Title: senior writer director sai paranjpye guest in loksatta gappa event
Next Stories
1 वैद्यकीय प्रवेशोत्सुकांचे तपशील दलालांच्या हाती
2 दुष्काळग्रस्त भागांतील सिंचनाची समस्या सुटणार
3 विद्यार्थी वाहतुकीसाठी छोटय़ा १३ आसनी वाहनाचा विचार करा
Just Now!
X