शेअर बाजारात आज टेन्शन वाढलेलं पाहण्यास मिळालं कारण सेन्सेक्स १११५ अंकांनी घसरला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात जरा बरं वातावरण होतं. मात्र आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी शेअर बाजार १११५ अंकांनी कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला. ही परिस्थिती अगदी मार्च महिन्यासारखीच आहे असं अर्थ तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

निफ्टीचीही घसरगुंडी
निफ्टीचीही घसरगुंडी पाहण्यास मिळाली. ३५० अंकांच्या घसरणीनंतर १०८०० च्या अंकांवर आला. निफ्टी ३५० अंकांनी घसरला. तर दिवसाच्या शेवटी १०८०५ अंकांवर स्थिरावला. भारतीय शेअर बाजारात विक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याने गुंतवणूकदारांच्या ३ लाख ९२ हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

बँकिंग, आयटी, ऑटो शेअर घसरले
आज कारभारादरम्यान शेअर बाजारातील बीएसई इंडेक्सचे सगळे शेअर लाल निशाण्यावर होते. संपूर्ण कारभाराच्या शेवटच्या तासात इंडसइंड बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी घसरले. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही टॉप लूझर्समध्ये होते. टाटा स्टील, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, मारुती,एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली होती. औषध कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. अखेरच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६६ अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २२ अंकांची घसरण होऊन बाजार अनुक्रमे ३७,६६८,४२ आणि ११,१३२ वर बंद झाला होता.

जागतिक स्तरावर करोना व्हायरसचा वाढता प्रभाव आणि लशीसंदर्भात कोणताही ठोस उपाय समोर न येणं या गोष्टींमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. जागतिक स्तरावरचे गुंतवणूकदार हे सध्या सावधगिरी बाळगत आहेत. दरम्यान जगात करोनाची जी स्थिती निर्माण झाली आहे त्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहण्यास मिळतो आहे.