केंद्र सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या परकीय गुंतवणूक धोरणातील (एफडीआय) सुधारणांचे भांडवली बाजारात सकारात्मक पडसाद उमटले आहेत. या निर्णयानंतर देशाच्या शेअर बाजाराने मोठी उसळी घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने ६० अंकांनी उसळी घेतली असून हा निर्देशांक ८,२३१च्या पातळीवर जाऊन पोहचला आहे. दुसरीकडे, सेन्सेक्स २११ अंकांनी वधारला असून २६, ८३७ च्या पातळीवर जाऊन पोहचला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षण, हवाई वाहतूक, विमानतळ, औषध निर्मिती आणि पशुपालन या क्षेत्रांध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. परकीय गुंतवणूकीसंदर्भातील धोरणात नोव्हेंबर २०१५ नंतर दुसऱ्यांदा अशाप्रकारचे पायाभूत बदल करण्यात आल्याचे सरकारी माहितीपत्रकात म्हटले आहे. यामध्ये काही अपवाद वगळता बहुतांश क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणुकीला थेटपणे मंजूरी मिळणार आहे.