सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

मुंबई : येथे दुसऱ्या मताचा अनादर केला जात नाही, पण मुस्लिमांच्या नाही, तर भारताच्या वर्चस्वाचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे परखड मतप्रदर्शन सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी येथे केले. भारतात राहणाऱ्या हिंदू व मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. देशाची प्रगती व विकास साधण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन भागवत यांनी केले.

‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशन’तर्फे मुंबईत ‘राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वतोपरी’ परिषदेत सरसंघचालक भागवत यांच्यासमवेत केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, काश्मीर केंद्रीय विद्यालयाचे कुलपती लेफ्टनंट जनरल सय्यद अटा हुसेन उपस्थित होते. मुस्लीम समाजातील बुद्धिजीवी व विचारवंतांशी भागवत व अन्य मान्यवरांनी संवाद साधला.

देशाची गौरवशाली परंपरा हा एकतेचा आधार आहे, असे सांगून सरसंघचालक भागवत म्हणाले,

इस्लाम हा परकीय आक्रमकांबरोबर भारतात आला, हा इतिहास आहे व तो तसाच सांगणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजातील समजूतदार व विचारी नेत्यांनी आततायी व उथळ वक्तव्यांचा विरोध करायला हवा.  त्यांना हे काम दीर्घकाळ व प्रयत्नपूर्वक करावे लागेल. ही आपल्या सर्वाची मोठी परीक्षा असून ती बराच काळ द्यावी लागेल, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

यावेळी अरिफ मोहम्मद खान म्हणाले, जगात जेव्हा विविधतेला नष्ट करण्यात आले, तेव्हा अनिष्ट बाबी वाढत गेल्या. भारतीय संस्कृतीने कोणालाही कधीही परके मानले नाही.

लेफ्टनंट जनरल सय्यद अट्टा हुसेन यांनी पाकिस्तानबाबत सावधगिरीचा इशारा दिला. पाकिस्तानने १९७१ नंतर भारतात रक्तपात घडविण्याचे कारस्थान केले. पण हे कारस्थान यशस्वी होऊ दिले नाही. आता बदललेल्या परिस्थितीत पाकिस्तान भारतीय मुस्लिमांना लक्ष्य करू शकतो. त्यांचे हे कारस्थान सर्वानी हाणून पाडले पाहिजे, असे हुसेन यांनी स्पष्ट केले.

काश्मीरमध्ये परिस्थिती बदलली असली तरी अजूनही महिलांच्या प्रगतीला विविध क्षेत्रांमध्ये पुरेसा वाव मिळत नाही. त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे मत एका मुस्लीम क्रिकेटपटू महिला प्रशिक्षिकेने या संवादात व्यक्त केले. काही काश्मिरी मुलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृती म्हणजे ‘हिंदू’. हिंदू ही जाती किंवा भाषावाचक संज्ञा नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रगती व विकास यासाठी मार्गदर्शन करणारी ही परंपरा आहे. ती मानणारा प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असे आम्ही मानतो.

-मोहन भागवत, सरसंघचालक