हार्बरवरील वडाळा स्थानकाजवळील रावळी जंक्शनला गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे बुधवारी उपनगरीय वाहतूक सेवाचा पार बोऱ्या वाजला होता. याच गोंधळाची गंभीर दखल घेत रेल्वे रुळाशेजारील संवेदनशील ठिकाणांच्या सर्वेक्षणाचे आदेश रेल्वे मंत्रालयाचे सदस्य गिरीश पिल्ले यांनी दिले आहेत.  हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकालगत असणाऱ्या रावळी जंक्शनला लागलेल्या आगीमुळे तब्बल ७० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. या सेवा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यापूर्वीही गेल्या आठवडय़ाभरापासून रेल्वे सेवा विस्कळीत होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून यात अधिकारी दोषी आढल्यास कारवाई केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारची आणि बेस्ट प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. अन्य उपाययोजनांबाबत नियोजन केले जाणार असल्याचे रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी सांगितले.