अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्य़ातील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या तब्बल १२२ ने वाढली असून सर्वाधिक  प्रत्येकी ५८ संवेदनशील केंद्र ऐरोली आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघात तर जिल्ह्य़ातील सर्वात कमी २७ संवेदनशील मतदान केंद्र ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात आहेत.
संवेदनशील मतदान केंद्रांवर बोगस मतदान अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांची नेमणूक केली आहे. तसेच व्हिडीओग्राफर नेमले आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाणे मतदार संघात २२३, कल्याणमध्ये १८१ तर भिवंडीमध्ये २३८ संवेदनशील मतदान केंद्र होती. आता या तीन लोकसभा मतदारसंघांपैकी भिवंडीत आता २३४ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. कल्याणमध्ये संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या वाढून २८१ झाली आहे तर ठाणे लोकसभा मतदार संघातील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या  २४९ इतकी झाली आहे.  यादीत छायाचित्रे नसणाऱ्या मतदारांचे प्रमाण, यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या, आधीच्या निवडणुकांदरम्यान घडलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आदी निकषांच्या आधारे संवेदनशील मतदान केंद्र ठरवली जातात. ऐरोली आणि कळवा-मुंब््रय़ानंतर सर्वाधिक ४९ संवेदनशील मतदान केंद्र कल्याण पश्चिममध्ये आहेत.      
पेड न्यूजच्या तक्रारी
ठाणे जिल्ह्य़ातही काही ठिकाणी पेड न्यूज संदर्भात तक्रारी आल्या आहेत. मात्र त्याबाबत चौकशी सुरू असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यात नकार दिला.