पालिकेच्या दहा पथकांकडून घरोघरी तपासणी; परिसरातील २४ खासगी डॉक्टरांची मदतीला धाव

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचा फैलाव वाढू लागल्यामुळे मुंबई महापालिकेने या परिसरासाठी स्वतंत्र कृती आराखडा आखून आजार नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत पालिकेची दहा पथके येथे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी या परिसरातील २४ खासगी डॉक्टर पालिकेच्या मदतीला धावून आले आहेत.

धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीत करोनाचा प्रसार चिंताजनक आहे. हा प्रसार वाढत गेल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, याची जाणीव असल्याने पालिकेने केवळ धारावीतील करोना नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्या आराखडय़ात धारावीतील २१ प्रतिबंधित आणि पाच धोकादायक भाग निश्चित करण्यात आले आहेत.

या परिसरातील बाधितांच्या संपर्कात आलेले अति जोखमीच्या गटात ३३८, तर कमी जोखमीच्या गटात १२१५ व्यक्तींचा समावेश आहे. या भागातील रहिवाशांची तपासणी करण्यासाठी १० पथके स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पथकात दोन खासगी डॉक्टर, पालिकेच्या आरोग्य केंद्रावरील एक कर्मचारी आणि दोन आरोग्य स्वयंसेविकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पथकाला पीपीई कीट, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर देण्यात आले आहेत.

धारावीमधील कल्याणवाडी, मुकुंद नगर, सोशल नगर, मुस्लीम नगर, मदिना नगर या पाच भागांमध्ये करोनाबाधित सापडले असून ही पथके या परिसरातील घराघरांत पोहोचून नागरिकांची ताप, कफ आदींबाबत तपासणी करणार आहेत. करोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तीला तात्काळ विलगीकरण केंद्रात वा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

पालिकेची मोहीम

* ‘अतिधोकादायक’ वर्गातील धारावीतील व्यक्तींसाठी राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ३०० खाटांची, तर बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी धारावी म्युनिसिपल शाळेत ७०० खाटांच्या विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

* धारावीमधील २२५ सार्वजनिक शौचालये आणि प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दररोज नित्यनियमाने र्निजतुकीकरण करण्यात येणार आहे.