मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना आरोग्य केंद्रांमध्ये करोनाबाधित बालकांवरील उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. संकुलातील १००० खाटांच्या करोना आरोग्य केंद्रात २८ खाटांचा बालरोग विभाग उभारण्याची तयारी सध्या सुरू आहे. यांसाठी आवश्यक सामग्री, औषधे खरेदीची प्रक्रिया सुरू असून बालरोगतज्ज्ञ आणि अतिदक्षता विभागातील बालरोगतज्ज्ञ यांची नियुक्तीही केली आहे.

अनेकदा कुटुंबातील बालकांनाही संसर्ग झालेला असतो. अशा वेळी बालकांना कोठे पाठवायचे, असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा कुटुंबाची ताटातूट न होता एकाच रुग्णालयात बालकांनाही उपचार देता यावेत, यासाठी हा विभाग सुरू करण्यात येत आहे. याआधी अशा स्थितीत आम्ही सात ते आठ बालकांना दाखल करून उपचारही दिले आहेत. मुलांना रुग्णालयात मोकळे वातावरण वाटावे यासाठी विभागाची रचना ही वेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. मुलांचे मन रमवण्यासाठी विविध उपक्रमांसह खेळणीही येथे उपलब्ध असतील, असे आरोग्य केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.

नायर रुग्णालयात बाधित बालकांसाठी १५ खाटांचा कक्ष आहे. आणखी काही खाटा वाढविण्यात येणार असल्याचे विभागाच्या रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक यांनी सांगितले. मुंबईत आतापर्यंत शून्य ते अकरा वयोगटातील १९७७ बालकांना करोनाचा संसर्ग झाला असून ११ मृत्यूंची नोंद आहे. १० ते २० वयोगटातील ३६०२ बालकांना करोनाची बाधा झाली असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे.