मधुमेही रुग्णांमधील पावलांच्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपचार

मधुमेही रुग्णांमधील पावलांच्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यासाठी लवकरच गोकुळदास तेजपाल (जी.टी) रुग्णालयात स्वतंत्र ‘पोडियाट्रिक’ विभाग सुरू करण्यात येणार आहे. सध्या जी. टी. रुग्णालयात येणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून जास्त रुग्णांना पावलांसंबंधित आजार असतात. यावर प्रतिबंधात्मक व आधुनिक पद्धतीने उपचार सुरू करावेत यासाठी लवकरच जी.टी.रुग्णालयात स्वतंत्र पोडियाट्रिक विभाग सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

रुग्णांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जी. टी.रुग्णालय, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पेडियाट्रिक महाविद्यालय (जिनिव्हा) यांच्यातर्फे जी.टी. रुग्णालयात एक दिवसीय ‘फूटकॉन’ परिषदेचे आयोजन केले होते. शनिवारी आयोजित केलेल्या या परिषदेत मधुमेही व इतर रुग्णांमधील पावलांच्या आजारावरील उपचारपद्धतीबाबत चर्चा झाली. मुंबईतील पालिका किंवा सरकारी रुग्णालयात स्वतंत्र पेडियाट्रिक विभाग कार्यरत नाही. मात्र अनेक खासगी रुग्णालयात मधुमेही रुग्णांमधील पावलासंबंधित आजारासाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे.

सध्या पालिका आणि सरकारी रुग्णालयात मधुमेही रुग्णांच्या टणक झालेल्या पावलांची त्वचा मुळापासून काढली जाते. मात्र यामुळे रुग्णांना मोठी जखम होते. मात्र फूटकॉन परिषदेत जिनिव्हा येथून आलेल्या डॉक्टरांनी नवी उपचारपद्धतीची माहिती करून दिली. प्रत्येक वेळी रुग्णांच्या पावलांची त्वचा काढण्याची आवश्यकता नसते. तर पावलांचा काही भाग काढून उपचार करता येऊ शकतात, असे जी.टी.रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाच्या डॉ. विनया अंबारे यांनी सांगितले. स्वतंत्र पेडियाट्रिक विभाग सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनाही कमी पैशांमध्ये चांगली सेवा मिळू शकते.

सध्या जी.टी.रुग्णालयात पावलांवरील उपचारासाठी १०० रुपये आणि शस्त्रक्रियेसाठी ५०० रुपये आकारले जातात. नवीन उपचारपद्धती सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य रुग्णांना अगदी कमी पैशात चांगली सेवा देता येऊ शकते. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांनाही अशा प्रकारची उपचार घेणे शक्य व्हावे यासाठी जी. टी. रुग्णालयात पेडियाट्रिक विभाग सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे डॉ. अंबारे यांनी सांगितले.

नियमित रक्त व पाऊल तपासणी

अनेकदा मधुमेही रुग्ण त्यांच्या पावलांच्या आजाराबाबत जागृत नसतात. यातून अनेकदा रुग्णांना चालताना अडचणी येतात. पोडियाट्रिक विभागाच्या साहाय्याने अशा रुग्णांची नियमित रक्ततपासणी, पावलांची तपासणी, पावले टणक होण्यामागील कारणे यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे रुग्णांवरील उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. पावलांबरोबरच अनेकदा मधुमेही रुग्णांमध्ये नखांचा त्रास ही संभवतो. शनिवारी आणि रविवारी झालेल्या परिषदेत यांसारख्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.