मुंबई पालिकेची स्वतंत्र प्रयोगशाळा; चालू महिन्यापासून चाचण्या

मुंबई : करोना विषाणूचे होणारे उत्परिवर्तन आणि संभाव्य परिणाम वेळीच रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचण्या करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारली आहे. तेथे या महिन्यापासून चाचण्याही करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे दहा ते १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

करोना विषाणूची विविध उत्परिवर्तित रूपे भारतासह ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये आढळली आहेत. उत्परिवर्तनामुळे दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक होती, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनेही म्हटले आहे. आत्तापर्यंत किती रुग्ण आढळले, कोणत्या भागात आढळले यावरच लक्ष केंद्रित केले जात आहे. तसेच व्यक्तीला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे का, याचे निदान ‘आरटीपीसीआर’ चाचणीत होते. परंतु हा संसर्ग करोनाच्या उत्परिवर्तित रूपापासून झाला आहे का हे पडताळण्यासाठी ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ ही प्रगत चाचणी करणे आवश्यक असते. राज्यात ही चाचणी  सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) केली जाते. त्यामुळे सध्या ‘जनुकीय क्रमनिर्धारण’साठी नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविले जातात. तसेच त्यांचे अहवालही एक ते दोन महिन्यांनी येतात. शिवाय हे अहवाल थेट केंद्राला दिले जात असल्याने राज्याला किंवा मुंबईला तपशीलवार माहिती उपलब्ध होत नाही. तेव्हा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ चाचणीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी पालिकेने कस्तुरबा प्रयोगशाळेत या चाचण्या उपलब्ध केल्या आहेत.

महापालिकेने चाचण्या करण्यासाठी आवश्यक दोन यंत्रांची खरेदी केली आहे. या महिनाभरात ही प्रयोगशाळा कार्यान्वित होऊन चाचण्या सुरू होतील. यासाठी सुमारे १० ते १२ कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

१०० नमुन्यांच्या चाचण्या

कस्तुरबातील प्रयोगशाळेने अभ्यासतत्त्वावर आयआयटीतील ‘हेस्टॅक अ‍ॅनॅलॅटिक्स’ कंपनीच्या मदतीने १०० नमुन्यांच्या ‘जनुकीय क्रमनिर्धारण’चाचण्या केल्या आहेत. ‘हेस्टॅक अ‍ॅनॅलॅटिक्स’ ही आयआयटीतील स्टार्टअप कंपनी आहे. विषाणूच्या जनुकीय रचनेच्या मदतीने संसर्गाचा प्रसार कशा रीतीने होत आहे, याचे मोजमाप करण्याचे तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले आहे. त्याचबरोबर विषाणूच्या जनुकीय रचनेत झालेले बदलही शोधण्याचे तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले आहे. त्याच्या मदतीने शहरातील १०० नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेने केली असून त्यांची विश्लेषणात्मक तपासणी सुरू आहे. याव्यतिरिक्त मुंबईतून जवळपास १५० नमुने चाचणीसाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहेत, अशी माहिती कस्तुरबातील प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी दिली.

अहवाल दोन दिवसांत

‘हेस्टॅक अ‍ॅनॅलॅटिक्स’ने विकसित केलेले ‘जनुकीय क्रमनिर्धारण’तंत्रज्ञान इतर प्रयोगशाळांप्रमाणेच आहे. परंतु चाचण्यांचे अहवाल जलदगतीने म्हणजे दोन दिवसांत दिले जातात आणि त्यांचे दरही कमी आहेत. एका चाचणीसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो. आम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे चाचणी निम्म्या किमतीत होते. चाचण्यांची संख्या अधिक असेल तर दर आणखी कमी होऊ शकेल, असे ‘हेस्टॅक अ‍ॅनॅलॅटिक्स’चे संस्थापक अनिर्वाण चॅटर्जी यांनी सांगितले.

अमेरिकी सामाजिक संस्थेशी करार

जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या करण्यासाठी पालिका अमेरिकेतील सामाजिक संस्थेशी करार करीत असून आयआयटीच्या ‘हेस्टॅक अ‍ॅनॅलिटिक्स’बरोबरही प्राथमिक चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्याभरात मृत्यू झालेल्या बाधितांचे नमुने पालिकेकडे आहेत, सुरुवातीला त्यांच्या चाचण्या केल्या जातील. टप्प्याटप्प्याने याचा विस्तार केला जाईल. तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढायला लागली की या रुग्णांमध्ये विषाणूचे उत्पर्वितन होत आहे का याचे निदान करण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावेल. जनुकीय क्रमनिर्धारणच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीचा वापर कसा करावा यासाठी डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे. त्यासाठी जैवसांख्यिकी तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. त्यासाठी ‘हेस्टॅक अ‍ॅनॅलिटिक्स’ची मदत घेतली जाणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

माहितीसाठी डॅशबोर्ड

जनुकीय क्रमनिर्धारण अहवालातील माहिती सांखिकी असून ती किचकट असते. ही माहिती सोप्या भाषेत आणि संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक तपशील आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यासाठी डॅशबोर्ड फायदेशीर ठरतो. विषाणूच्या कोणत्या प्रकारच्या उत्परिवर्तनामुळे लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग होत आहे, इत्यादी माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून थेट उपलब्ध होईल. रुग्णामध्ये उत्परिवर्तित विषाणूचा कोणता प्रकार आहे, सारखी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्येही तोच प्रकार आहे का इत्यादी माहिती डॅशबोर्डमुळे समजणे सोपे होईल. हा डॅशबोर्ड तयार झाला असून त्यात माहिती भरली की तो कार्यान्वित होईल, असे ‘हेस्टॅक अ‍ॅनॅलिटिक्स’चे संस्थापक अनिर्वाण चॅटर्जी यांनी सांगितले.

जनुकीय क्रमनिर्धारण कशासाठी?

’व्यक्तीला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे का, याचे निदान ‘आरटीपीसीआर’ चाचणीत होते. परंतु हा संसर्ग उत्परिवर्तीत रूपापासून झाला आहे का हे पडताळण्यासाठी ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ ही प्रगत चाचणी आवश्यक ठरते.

’विषाणूमध्ये उत्परिवर्तन कसे झाले, कोणत्या प्रकारचे उत्परिवर्तित विषाणू आहेत, याची माहिती या चाचणीतून मिळते.

’कोणत्या विषाणू प्रकाराचा संसर्ग जलद पसरत आहे? बालकांमध्ये त्याची तीव्रता वाढत आहे का? लसीकरण झालेल्या लोकांना त्याचा संसर्ग होत आहे, का हे समजणे सोपे जाते.