गेल्या दोन वर्षांपासून अभियांत्रिकीच्या प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांच्या मागे लागलेले ‘जेईई-मेन्स’ या केंद्रीय ‘सामाईक प्रवेश परीक्षे’चे शुक्लकाष्ठ आता सुटणार असून त्यामुळे राज्यातील तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण, वैद्यकीयप्रमाणे अभियांत्रिकीच्याही विद्यार्थ्यांवरील प्रवेश परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून राज्य सरकार अभियांत्रिकीकरिता राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित राज्याची स्वतंत्र सीईटी घेण्याचा विचार करते आहे.
क्लासचालकांचे महत्त्व समाप्त करण्यासाठी ‘वन नेशन, वन सीईटी’चा नारा देत काँग्रेसप्रणित केंद्र सरकारने अभियांत्रिकी प्रवेशांकरिता सर्व राज्यांना ‘जेईई’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या परीक्षेत सहभागी होण्याचे बंधन नसतानाही महाराष्ट्राने जेईई स्वीकारली. जेईई ही परीक्षा खरेतर ‘आयआयटी’ तील प्रवेशांकरिता घेतली जाते. त्यामुळे तिची काठीण्यपातळीही इतर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तुलनेत खूपच जास्त असते. या शिवाय ही परीक्षा एनसीईआरटीचा आराखडा स्वीकारलेल्या सीबीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. या परीक्षेचा अभ्यास आपल्या सर्वसामान्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झेपणार नाही, हे लक्षात आल्याने अनेक राज्यांनी जेईईत सहभागी होण्याचे टाळले. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्रासह केवळ गुजरात आणि ओरिसा ही दोन राज्येच जेईईच्या आधारे राज्याअंतर्गत अभियांत्रिकी संस्थांचे प्रवेश करतात.
महाराष्ट्रातही जेईईमुळे अभ्यासाचा येणारा ताण पाहता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून या परीक्षेला विरोध होत होता. राज्यात तर हा ताण दुहेरी आहे. कारण, महाराष्ट्रात जेईईबरोबरच बारावीच्या गुणांनाही प्रवेशांमध्ये ५० टक्क्य़ांचे महत्त्व दिले जाते. बारावीचे परीक्षेचे स्वरूप दीघरेत्तरावर आधारित आहे. तर जेईईतील प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असल्याने दोन्हींचे अभ्यासाचे स्वरूप वेगळे. त्यामुळे, वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जेईईमुळे होणारा त्रास हा खूप जास्त होता. त्यातून जेईई अकरावी-बारावी अशा दोन्ही अभ्यासक्रमावर आधारलेली असते. तर बारावीच्या परीक्षेनंतर अवघ्या १५ ते २० दिवसात विद्यार्थ्यांना जेईईला सामोरे जावे लागते. त्यामुळे, जेईईच्या अभ्यासालाही विद्यार्थ्यांना फार वेळ मिळत नाही. विद्यार्थ्यांनाच काय तर शिक्षकांनाही हा अभ्यासक्रम पेलेनासा नसल्याने याचा फायदा कोचिंग क्लासेसने घेतला होता. जेईईमुळे गेल्या तीन-चार वर्षांत महाराष्ट्रात कोचिंग क्लासेसने लहानमोठय़ा शहरांमध्येही हातपाय पसरले होते. तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी प्रवेशाचे स्वप्न दुरापास्त करून टाकले होते. हे चित्र आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुहेरी ताण!
महाराष्ट्रातही जेईईमुळे अभ्यासाचा येणारा ताण पाहता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून या परीक्षेला विरोध होत होता. राज्यात तर हा ताण दुहेरी आहे. कारण, महाराष्ट्रात जेईईबरोबरच बारावीच्या गुणांनाही प्रवेशांमध्ये ५० टक्क्य़ांचे महत्त्व दिले जाते.

४ एप्रिलला होणाऱ्या ‘जेईई-मेन्स’करिता राज्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर नवा बदल लादणे उचित होणार नाही. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षांपासून जेईईऐवजी राज्याच्या सीईटीतून अभियांत्रिकीचे प्रवेश केले जातील. बारावीच्या परीक्षेचे अभियांत्रिकी प्रवेशातील महत्त्व मात्र कायम राहील.
– विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री