करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी चार नवीन जम्बो रुग्णालय उभारताना ही रुग्णालये एक वर्षाहून अधिक काळ टिकतील अशी त्याची रचना असणार आहे. तसेच या सर्व रुग्णालयात लहान मुलांसाठी किमान ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार २५० खाटा करता येतील, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने जम्बो रुग्णालयांची क्षमता वाढविण्याचा तसेच बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. आजघडीला पालिकेच्या आठ जम्बो करोना रुग्णालयात मिळून १०,८३० खाटा आहेत. यात अतिदक्षता विभागात ८७२ तर व्हेंटिलेटरच्या ५७४ खाटा आहेत. आजपर्यंत एक लाख नऊ हजार रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले असून ही जम्बो रुग्णालये उभारताना साधारणपणे सहा महिने कालावधीचा विचार करून उभारण्यात आली होती. अलीकडे झालेल्या दोन चक्रीवादळानंतर या आठही जम्बो करोना रुग्णालयांच स्ट्रक्चरल ऑडिट तसेच फायर ऑडिट करून नव्याने मजबुतीकरणाचे काम करण्यात येत आहे. यात बीकेसी, नेस्को टप्पा एक व दोन, दहिसर येथील दोन, नेस्को, डोम, मुलुंड व सेव्हन हिल्सचा समावेश आहे. आता नव्याने मालाड, कांजुरमार्ग, सायन व महालक्ष्मी येथे जम्बो रुग्णालये उभारण्यात येत असून याठिकाणी ७० टक्के ऑक्सिजन खाटा व १० टक्के अतिदक्षता विभागासाठी खाटा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग या सर्व ठिकाणी करण्यात येणार असून सुरुवातीला २५ ते ५० खाटांची व्यवस्था येथे केली जाणार आहे. या मुलांसाठी लागणारी उपकरणे खरेदी केली जातील. आवश्यकता भासल्यास याच ठिकाणी २५० खाटांची व्यवस्था होऊ शकेल. त्यासाठी आवश्यक ती रचना तेथे करण्यात येईल, असेही सुरेश काकाणी म्हणाले.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांची संख्या वाढेल हे तज्ज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन मुंबईतील २४ विभागात बालरोगतज्ज्ञ तसेच अन्य डॉक्टरांबरोबर आमच्या बैठका सुरु आहेत. लहान मुलांसाठीच्या कृती दलाकडून येणाऱ्या सूचना तसेच करावयाचे उपचार याची माहिती सातत्याने मुंबईतील सर्व संबंधित डॉक्टरांना कळवली जाणार आहे. बालरोगतज्ज्ञ तसेच पालिकेचे विभागातील संबंधित अधिकारी यांच्याही विभागनिहाय बैठका सुरु झाल्या आहेत. मधल्या काळात रुग्ण वाढीमुळे ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली होती. तेव्हा २५० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज लागायचा सध्या रुग्ण संख्या कमी झाल्याने १३० मेट्रिक टनांपेक्षा कमी ऑक्सिजन लागत आहे. तथापि आम्ही भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. त्याचबरोबर ऑक्सिजनचा वापर नेमका किती व कसा करायचा तसेच तो वाया जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याचही मार्गदर्शन संबंधितांना करण्यात आले आहे. रेमडेसिवीरपासून म्युकरमायकोसिसच्या औषधांपर्यंत कशाचीही कमतरता नसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.