महाराष्ट्रदिनी ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन केले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. तरीही ही घोषणा महाराष्ट्रदिनी मूर्त स्वरूपात येण्याची शक्यता नाही. कारण पालघर हे नव्या जिल्ह्य़ाचे मुख्यालय करण्यास राजकीय पातळीवर काही नेत्यांनी विरोध दर्शविल्याने जिल्हा विभाजनाच्या फायलीला उपमुख्यमंत्र्यांची मंजुरीच अद्याप मिळू शकलेली नाही.
ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्य़ाची निर्मिती करण्याचा निर्णय शासकीय पातळीवर झाला. महाराष्ट्र दिनी नव्या जिल्ह्य़ाची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र, येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार नसल्याने जिल्हा विभाजनाची घोषणाही लांबणीवर पडली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याला पुष्टी दिली आहे. जिल्हा विभाजनाच्या संदर्भातील फाइल ही सध्या वित्त खात्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आणखी खर्चाचा बोजा नको, असा युक्तिवाद विभाजन पुढे ढकलण्यासाठी केला जात आहे.
पालघर जिल्हा निर्मितीनंतर नव्या जिल्ह्य़ात काँग्रेसचे वर्चस्व वाढेल, अशी भीती राष्ट्रवादीला आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही मध्यंतरी काही आक्षेप घेतले होते. जिल्हा विभाजन करताना पालघरप्रमाणेच कल्याण या आणखी तिसऱ्या जिल्ह्य़ाची निर्मिती करावी, अशी राष्ट्रवादीच्या काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. वसई-विरारमधील ठाकूर यांचेही काही आक्षेप आहेत.
      नव्या जिल्ह्य़ाच्या निर्मितीकरिता वित्तीय तरतूद तसेच शासकीय कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करणे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे.- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री