रेल्वेच्या सगळ्याच प्रकल्पांप्रमाणे कालमर्यादा ओलांडण्याच्या कसोटीवर पुरेपूर उतरलेली वातानुकूलित गाडी आता १० सप्टेंबपर्यंत चाचणीसाठी सज्ज होणार आहे. सध्या कुर्ला कारशेडमध्ये चाचणीसाठी तयार होत असलेली ही गाडी मध्य किंवा पश्चिम यापैकी कोणत्या मार्गावर चालणार, याचा निर्णय मात्र रेल्वे बोर्डामध्येच होणार आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी या गाडीच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देताना ही गाडी चाचणीसाठी तयार होण्यास अजून २०-२५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले. गाडीच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्याची गरज असून त्यानंतर विद्युत यंत्रणेची चाचणीही करणे गरजेचे आहे.
ही गाडी मध्य रेल्वेमार्गावर चालवण्यासाठी गाडीच्या उंचीचा अडथळा असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मध्य रेल्वेमार्गावर अनेक जुने पूल असून त्यांची उंची कमी आहे. मात्र, येत्या १० सप्टेंबपर्यंत ही गाडी चाचणीसाठी तयार होईल, असे अग्रवाल यांनी सांगितले. गाडीच्या सर्व तांत्रिक बाजू सुरक्षित झाल्यानंतर सुरुवातीला कारशेडमध्येच तिच्या चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर प्रत्यक्ष चाचणीसाठी ही गाडी पश्चिम रेल्वेच्या ताब्यात जाईल की मध्य रेल्वेच्या ताब्यात येईल, हा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जाणार असल्याचेही अग्रवाल यांनी म्हटले.