देशभरातील साधारण ५० बॉम्बस्फोटांसह १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग असलेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी उर्फ ‘डॉ.बॉम्ब’ हा मुंबईतून बेपत्ता झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्सारी बेपत्ता झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेसह सर्वच सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

आज (शुक्रवार) अन्सारीचा पॅरोल संपणार होता. यानंतर त्याला अजमेर तुरूंगात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गुरूवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाला. त्याच्यावर १९९२ पासून सहा बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप आहेत. त्याला अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना अशाप्रकारचा खतरनाक दहशतवादी बेपत्ता होणं, हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. सर्व तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत.