News Flash

लेखकांच्या हक्कासाठी ‘मानाचि’ चळवळ

छोटा पडदा, रंगमंच आणि मोठा पडदा या तीनही माध्यमातून काम करणाऱ्या कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे प्रश्न निकाली लावण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील कलाकार व तंत्रज्ञांच्या अनेक संघटना अस्तित्त्वात

| May 17, 2015 04:22 am

छोटा पडदा, रंगमंच आणि मोठा पडदा या तीनही माध्यमातून काम करणाऱ्या कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे प्रश्न निकाली लावण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील कलाकार व तंत्रज्ञांच्या अनेक संघटना अस्तित्त्वात आहेत. यावरूनच आता मालिका, नाटके आणि चित्रपट या तीनही माध्यमांतील अत्यंत महत्त्वाच्या घटकाने म्हणजेच लेखकांनी धडा घेत आपलीही संघटना सुरू केली आहे. सध्या काम करत असलेल्या लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवण्याबरोबरच नवीन लेखकांची पिढी घडवण्यासाठी ही ‘मानाचि’ लेखक संघटना विविध उपक्रम राबवणार आहे. या संघटनेची पहिली बैठक नुकतीच मुंबईत पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे पार पडली.
रंगमंचावर घडणारे नाटक असो किंवा छोटय़ा पडद्यावर साकारणारी मालिका, या प्रत्येक प्रकारात लेखकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तरीही नाटक, चित्रपट किंवा मालिका यांच्या लेखकांना म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही. अनेकदा लेखकांना श्रेय नामावलीत डावलणे, मालिकांचे लेखक अचानक बदलणे आदी गोष्टी घडतात. या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्या घडल्यास त्याविरोधात संघटितपणे प्रयत्न करण्यासाठी मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही माध्यमांत कार्यरत असलेल्या लेखकांनी एकत्र येत संघटना स्थापन केली आहे.
या संघटनेच्या पहिल्याच बैठकीत मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही क्षेत्रांत लेखकांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर आगामी काळात लेखकांच्या हितासाठी काय काय उपक्रम राबवता येतील, याबाबतही निर्णय झाले. ही संघटना कोणत्याही वाहिनीच्या वा निर्मात्यांच्या विरोधात नाही, तर त्यांना विश्वासात घेऊन काम करेल. विविध वाहिन्यांच्या प्रमुखांसह एक चर्चासत्र आयोजित करेल, असे ‘मानाचि’चे प्रवक्ते कौस्तुभ दिवाण यांनी सांगितले.
‘मानाचि’चे उपक्रम
*जून महिन्यात पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मदतीने मालिका लेखन कार्यशाळा.
*लेखकांसाठी पुरस्कार सोहळा आयोजित करणे.
*दृश्य माध्यमात काम करणाऱ्या लेखकांचे संमेलन भरवणे.
*चॅनलच्या प्रोग्रामिंग प्रमुखांसह चर्चासत्र आयोजित करून लेखकांकडून असलेल्या अपेक्षा समजून घेणे.
*लेखक गोष्ट विकसित करत असतानाच्या प्रक्रियेसाठीही त्याला मानधन देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रयत्न करणे.
*मालिकांच्या मानधनासाठी असलेला क्रेडिट कालावधी रद्द करून वेळच्या वेळी मानधन मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
*मालिकांचे लेखक बदलताना लेखकाला नोटिस कालावधी मिळेल. तसेच दुसऱ्या लेखकाला पहिल्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागेल, याबाबत बदल करणे.
*रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाच्या जाचक नियमांबाबत काही ठोस पावले उचलणे.

‘मानाचि’चे मान्यवर
सचिन दरेकर, पुरुषोत्तम बेर्डे, महेंद्र कदम, विवेक आपटे, चिन्मय मांडलेकर, राजेश देशपांडे, शिरीष लाटकर, सचिन मोटे, आशिष पाथरे, सुहास कामत, देवेंद्र पेम, गंगाराम गवाणकर, सुरेश जयराम, गणेश पंडित, अंबर हडप, मिलिंद फाटक, मंदार चोळकर, राजेश जोशी, अरविंद औंधे, स्वप्निल गांगुर्डे, कौस्तुभ दिवाण, निनाद शेटय़े, अमोल मटकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 4:22 am

Web Title: serial drama cinema movment for writers
Next Stories
1 मुंबईतील धातू बाजाराचे गुजरातला स्थलांतर
2 अंबरनाथ, बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष
3 वसई-विरार पालिकेची १४ जूनला निवडणूक
Just Now!
X