रस्त्यावर एकटी महिला पाहिली की तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग करून बुलेटवरून पळ काढणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंद्र शहा असे या आरोपीचे नाव असून त्याला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक महिलांचा विनयभंग करून धूम ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्याच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. नवघर पोलिसांनी घाटकोपरच्या आर सिटी मॉलजवळ या विकृताला सापळा रचून जेरबंद केले.ज्यानंतर त्याने चौकशीत गुन्हा केल्याची कबुली दिली.

7 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक महिला म्हाडा कॉलनी भागात शतपावली करत होती. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संभाजी मैदानात ती आली होती. ती पायी चालत असतानाच आर. आर. एज्युकेशन जवळच्या बस स्टॉपजवळ आली. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी वीरेंद्र शहा याने तिच्याशी अश्लील चाळे केले आणि बुलेटवरून पळ काढला. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली त्यानंतर विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीचा माग काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

वीरेंद्र शहा हा कोपरी येथील रहिवासी आहे, त्याने मुलुंड आणि ठाणे परिसरातल्या अनेक महिलांशी अश्लील चाळे करून पोबारा केला आहे. वीरेंद्र शहा विक्षिप्त आणि विकृत असून रस्त्यावर चालणाऱ्या एकट्या महिलेला पाहिले की तो तिच्या मागून यायचा तिच्याशी अश्लील चाळे करून पळ काढायचा. अनेक महिला या विकृत माणसाच्या अश्लील चाळ्यांना बळी पडल्या होत्या मात्र बदनामी होईल या भीतीने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. यामुळे वीरेंद्र शहाची हिंमत वाढली होती. आता अखेर त्याला जेरबंद करण्यात आलं आहे. या धडक कारवाईत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागाचे लखमी गौतम, पोलीस उपयुक्त परिमंडळ-७, अखिलेशकुमार सिंह सहाय्यक पोलीस आयुक्त मुलुंड विभाग पांडुरंग शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, जाधव पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक,कसार खैरनार, पोलीस शिपाई धोंडे यांनी सहभाग घेऊन आरोपीचा पिच्छा पुरवला आणि त्याला अटक केली.