युद्धात वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित शस्त्रे आणि उपकरणे याविषयी माहिती करून देणारा कार्यक्रम ‘कॉम्बॅट टेक’ आज, बुधवारपासून रात्री १० वाजता डिस्कव्हरी सायन्स वाहिनीवरून दाखविण्यात येणार आहे.
दर बुधवारी दाखविण्यात येणाऱ्या दहा भागांच्या या मालिकेत बॉम्बवर्षांव करणारी विमाने, त्यातील रचना, उपकरणे दाखविण्यात येतील. त्यामध्ये आगामी काळात वापरली जाणारी बी-५२,. स्टेल्थ बी-२ ही विमानेही पाहायला मिळणार असून गुप्त पद्धतीने बॉम्बवर्षांव करणारी ही विमाने असून ५० हजार फुटांपेक्षाही अधिक उंचावरून ती बॉम्बवर्षांव करू शकतात. जमिनीवरील आईईटी स्फोटके निकामी करण्याचे काम रोबोटिक सैनिक करू शकतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. फायटर्स या भागात एफ-१५, एफ-१८ या अद्ययावत युद्ध विमानांची रचना, त्यात वापरलेली अभियांत्रिकी याविषयी माहिती दिली जाणार आहे. अभियांत्रिकीचा आविष्कार असलेली अनेक शस्त्रे, उपकरणे यांची माहिती दहा भागातून मिळेल.