जसलोकमध्ये कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवलेला कल्याणचा ३८ वर्षीय रुग्ण करोना संसर्गातून पूर्णपणे बरा झाला असून त्याला बुधवारी घरी सोडण्यात आले.

अमेरिकेहून परतल्यानंतर काहीच दिवसांत या तरुणाला करोनाची लागण झाली होती. परंतु कोणतीही लक्षणे सुरुवातीला दिसत नव्हती. त्यामुळे तो बाधित असल्याचे उशिरा निष्पन्न झाले. तोपर्यंत सोलापूरला एका लग्न सोहळ्यासह अनेक ठिकाणी त्याने भेट दिली होती. कस्तुरबामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते, परंतु प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला जसलोकमध्ये हलवले होते. तेथे कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते.

जसलोकमध्ये कृत्रिम श्वसनयंत्रेणवर ठेवल्यानंतर या रुग्णाच्या फुप्फुसांच्या कार्यात सुधारणा झाली. अचूक व्यवस्थापन आणि योग्य उपचाराच्या मदतीने संसर्गातून बरे होणे शक्य आहे. या तरुणाला धूम्रपानाचे व्यसन नाही वा अन्य कोणताही आजारही नव्हता, असे त्याच्यावर उपचार करणारे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले. त्याची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीलाही संसर्ग झाला होता. तेही करोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत. एक आठवडय़ापूर्वी मी जगण्यासाठी झगडत होतो, यावर विश्वास बसत नाही. आधी इतकाच मी पुन्हा ठणठणीत झालो आहे. कार्यालय आणि वैद्यकीय विम्यामुळे माझ्या उपचारांचा १२ लाखांचा खर्च पेलणे शक्य झाले. खर्चात रुग्णालयानेही सवलत दिली, असे या तरुणाने सांगितले.