युरोपात महाविद्यालयीन तरुणांनाही चित्रकारांविषयी माहिती असते. मात्र आपल्याकडे चित्रकला हा विषय शाळेत ऐच्छिक असल्याने सामान्य माणसाला कलेची जाण नसते. त्यामुळे कलेचे गांभीर्य शाळेपासूनच यायला हवे, असे मत राजकीय व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगचित्रांचे ‘बिटवीन द लाइन्स’ हे प्रदर्शन बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या कलादालनात भरले आहे. याचे उद्घाटन राज ठाकरे आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. हे प्रदर्शन ४ ते ७ जानेवारी दरम्यान दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.

मानवी चित्र, वास्तववादी चित्र यांच्यावरील पकड पक्की झाल्यानंतर व्यंगचित्र ही शेवटची पायरी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने २० हजार व्यंगचित्रे काढणे ही सोपी गोष्ट नाही. कुलकर्णी यांनी युरोपात आपल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवावे, असेही राज म्हणाले.

एक रेषा राज ठाकरे यांच्या राजकीय व्यंगचित्रांची आहे. दुसरी चित्रांची रेषा माझी आहे. या दोन्ही रेषांमधील आशय प्रशांत कुलकर्णी यांनी पकडला आहे, असे म्हणत शि. द. फडणीस यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. बैल हा प्राणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या संस्कृतीशी जोडला गेला आहे. बैल म्हणजे शेती, बैल म्हणजे धर्म, खेळ, इत्यादी. मात्र तरीही तो कायम दुर्लक्षित राहातो. गाय काहीही न करता महान बनते. असा हा बैल माझ्याकडे आपले दुख व्यक्त करतो आणि विसाव्याला माझ्या व्यंगचित्रांमध्ये येतो, असे स्पष्टीकरण कुलकर्णी यांनी आपल्या व्यंगचित्रांतील बैलाच्या वापराबाबत दिले.

‘विकास सबनीस यांच्यासाठी या प्रदर्शनाचे निमंत्रण तयार केले आणि काही मिनिटांतच त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. हा माझ्यासाठी धक्का होता. ते आज या प्रदर्शनाला यायला हवे होते’, असे म्हणत कुलकर्णी यांनी सबनीस यांना श्रद्धांजली अर्पण केली.

२० हजार व्यंगचित्रे.. : नवोदित व्यंगचित्रकाराला संपादकांनी सांभाळून घेतले पाहिजे. संपादकांनी पाठिंबा दिला की, व्यंगचित्रकारालाही हुरूप येतो, असे कुलकर्णी म्हणाले. त्यांनी विविध माध्यमांतून २० हजार व्यंगचित्रे आतापर्यंत काढली आहेत. त्यातील निवडक १५० व्यंगचित्रांचे हे प्रदर्शन आहे. ‘लोकसत्ता’मधून प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रांचाही यात समावेश आहे.