आयसीएमआरच्या सूचनेनुसार निर्णय; मुंबईत दिवसभरात १,२९७ करोना रुग्ण

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सूचनेनुसार पालिके ने मुंबईमधील वांद्रे (पश्चिम), माटुंगा आणि दहिसर परिसरातील नागरिकांचे रक्त नमुने घेऊन सर्वेक्षण (सेरो) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोनाच्या संक्रमणाची तीव्रता समजू शकेल.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी एक हजार २९७ जणांना करोनाची बाधा झाली असून करोनाबाधितांची संख्या ७२ हजार २८७ वर पोहोचली आहे. तर गेल्या ४८ तासांमध्ये ४४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

करोनाच्या संसर्गाच्या संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी पालिकेने ‘आयसीएमआर’च्या सूचनेनुसार मुंबईतील वांद्रे (पश्चिम) (एच-पूर्व), माटुंगा (एफ-उत्तर) आणि दहिसर (आर-उत्तर) परिसरात ‘सेरो’ सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  ‘सेरो’ सर्वेक्षणासाठी यापूर्वी पालिकेने ५०० जणांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या सर्वेक्षणातून सर्वसाधारणपणे लोकसंख्येमध्ये झालेल्या संक्रमणाचा भौगिलिक फैलाव समजून घेण्यास मदत होणार आहे.

या सर्वेक्षणादरम्यान तब्बल १० हजार रक्त नमुने गोळा करण्यात येणार आहेत. नीती आयोग, ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च, मुंबई’ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) आणि बिगर शासकीय संस्था यांच्या पथकाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

संबंधित नागरिकांच्या घरी भेटी देऊन हे पथक माहिती आणि रक्त नमुने गोळा करणार आहे. कस्तुरबा सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळा, तसेच फरिदाबाद येथील ट्रान्सलेशलन हेल्थ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये हे नमुने पाठविण्यात येणार असून तेथे नमुन्यातील प्रतिपिंडांचे निदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईमधील विविध रुग्णालयांमध्ये शुक्रवारी ८६८ करोना संशयितांना दाखल करण्यात आले असून आतार्पय तब्बल ५० हजार ३५६ करोना संशयित विविध रुग्णालयात दाखल केले आहेत. आतापर्यंत मुंबईमधील तब्बल ७२ हजार २८७ जणांना करोनाची बाधा झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये पालिकेच्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार ४८ तासांमध्ये ४४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर तत्पूर्वी मृत्युमुखी पडलेल्या ७३ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याचे चाचणी अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी ५९५ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमधून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ३९ हजार ७४४  झाली आहे.

२४ तासांत राज्यात पाच हजार रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत पाच हजारांपेक्षा जास्त  करोना रुग्णांचे निदान झाले. या कालावधीत ८४ जण दगावले, तर  ४८ तासांत ९१ जण मरण पावले. गेल्या दोन दिवसांत नव्याने १७५ मृत्यूंची नोंद झाली.  २,३६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५२.२५ टक्के  आहे.