15 October 2019

News Flash

तपास चक्र : नोकराकडूनच घात!

वामन जोशी राहात असलेल्या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज या पथकाने ताब्यात घेतले.

प्रतिकात्मक छायाचित्र

निशांत सरवणकर

nishant.sarvankar@expressindia.com

@ndsarwankar

वामन मल्हार जोशी हे ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक बोरिवली पश्चिमेतील जांभळी गल्ली येथे आपला ३५ वर्षांचा अविवाहित तरुण मुलगा विलाससह राहात होते. वामनरावांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळच जोशी यांचे ‘सद्गुरू’ नावाचे विविध खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान होते. बाप-लेक सकाळी नऊ वाजता दुकानात येत आणि रात्री दहानंतर दुकानापासून जवळच असलेल्या आपल्या घरी परतत. दुपारच्या वेळी वामन जोशी जेवणासाठी घरी जात आणि सायंकाळी पाचच्या सुमारास परत येत.

१७ एप्रिल रोजी महावीर जयंती होती. मात्र दुपारी घरी जेवायला गेलेले वामनराव पुन्हा दुकानात परतलेच नाहीत. विलासने मोबाइल फोनवर व घरच्या फोनवर त्यांच्याशी संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले. घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडला. जोशी हे सोफ्यावर निपचित पडलेले आढळले. त्यांनी तात्काळ विलासला कल्पना दिली. तो धावतच घरी आला तेव्हा वडील काहीच हालचाल करत नव्हते आणि आजूबाजूला सामान अस्ताव्यस्त पडले होते. विलासने ताबडतोब पोलिसांना व डॉक्टरांना बोलावले. वामन जोशी यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. घरातील रोकड चोरीला गेली होती. त्यामुळे चोरीच्या हेतूनेच वयोवृद्ध नागरिकाची हत्या झाल्याचे उघड झाले. गळ्यावर काही खुणाही पोलिसांना आढळल्या.

वयोवृद्ध नागरिकाची हत्या झाल्याचे कळताच उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ तपास सुरू केला. बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे, सुधीर घोसाळकर, महेश तावडे, जीवन निरगुडे, नीलेश मोरे, चव्हाण, सुशील सावंत, सर्फराज खान आदी अधिकारी व कर्मऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. उपायुक्त निशाणदार यांनी गुन्ह्य़ाची उकल करण्यात निष्णात असलेले कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी अडाणे व मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम नायर या दोन अधिकाऱ्यांची तपासकामी नेमणूक केली.

वामन जोशी राहात असलेल्या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज या पथकाने ताब्यात घेतले. जोशी यांच्या दुकानात सध्या असलेल्या व पूर्वी काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा तपशील मिळविला. त्यावेळी एक व्यक्ती गायब असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले. महेश गौडा असे त्याचे नाव. तो जोशी यांच्या दुकानात तब्बल सात वर्षे कामाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती आणि तो बंगळुरुला स्थायिक झाला होता, अशी माहिती या पथकाला मिळाली.

दुकान ते घर या मार्गावरील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण या पथकाने तपासले. तेव्हा महेशबद्दल त्यांना अधिक माहिती मिळाली. त्याचे छायाचित्रही या पथकाच्या हाती लागले. जोशी यांच्या इमारतीच्या आवारात काही अनोळखी व्यक्ती दिसल्या. त्यापैकी एका व्यक्तीशी त्याचे छायाचित्र जुळत होते. याशिवाय या अनोळखी व्यक्तींपैकी काहीजण दक्षिण भारतीय भाषा बोलत असल्याची माहितीही चौकशीत मिळाली होती. त्यामुळे या पथकाने महेशला ताब्यात घेण्याचे ठरविले. त्यासाठी पोलिसांचे पथक बंगळुरू येथील मंडया या परिसरातील घरी पोहोचले. परंतु तेथे तो सापडला नाही. त्याच्या मोबाइल फोनचे लोकेशन पोलिसांनी शोधून काढले. तेव्हा तो तिथे नसल्याचे लक्षात आले. तेथून तो बंगळुरू शहर आणि नंतर तामिळनाडूला गेला. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने महेशचा माग काढून पोलिसांनी एका शेतात तब्बल दोन किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. हत्येची कबुली मिळवायला पथकाला वेळ लागला नाही. महेशने दिलेल्या माहितीवरून अनिलकुमार पुट्टा स्वामी गौडा (२७) व किरणकुमार नंनजुंडे गौडा (२७) या त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली.

पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, महेश गौडा यानेच दरोडय़ाचा आणि हत्येचा कट रचला होता, असे चौकशीत स्पष्ट झाले. महेश हा वामन जोशी यांच्या दुकानात कामाला होता; परंतु दोन वर्षांपूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. बंगळुरूजवळील मंडया या गावी राहणाऱ्या महेशला जुगाराचे व दारूचे व्यसन असल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. आयपीएल सामन्यांचे बेटिंगही तो करत असे. त्याला बंगळुरुत स्वत:चे दुकान सुरू करायचे होते आणि त्यासाठी त्याला आपले जुने मालक वामन जोशी यांची आठवण झाली. जोशी हे दुकानातील दररोजची रोकड घरी ठेवतात, याची त्याला माहिती होती. त्यामुळे जोशी यांच्याकडे निश्चितच काही लाख रुपये सापडतील, याची खात्री होती.

गावातील दोन साथीदारांना घेऊन तो १७ एप्रिल रोजी जोशी यांच्या घरी गेला. १६ एप्रिल रोजी तिघे मुंबईत आले होते. त्यांनी मिठाई खरेदी केली आणि ते दुपारच्या वेळी जोशी यांच्याकडे गेले. महेश ओळखीचा असल्यामुळे त्यांनी घरात घेतले. याचाच फायदा घेत तिघांनी जोशी यांचा गळा दाबून खून केला. किमान दहा लाख तरी आढळतील, असे त्यांना वाटले होते. परंतु त्यांचा हेतू काही साध्य झाला नाही. त्याच्या हाती फक्त ५० हजार रुपये लागले. बोरिवली पूर्वेला ते रिक्षाने गेले आणि तेथून कर्नाटकात पळून गेले. मात्र त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना शोधून काढले.

First Published on May 15, 2019 3:32 am

Web Title: servant killed 70 year old shop owner in borivali