करोनाकाळात पीपीईसह चाचण्यांचे संच, कृत्रिम श्वसनयंत्रणेचा पुरवठा

मुंबई : करोना साथीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी केंद्राने राज्याला आत्तापर्यंत सुमारे ५९२ कोटी रुपयांची मदत केली असून यात वैयक्तिक सुरक्षा साधनांच्या पुरवठ्यासह कृत्रिम श्वसनयंत्रणाचा पुरवठा केला आहे.

साथीच्या काळात केंद्रीय आरोग्य विभागाने सुमारे सहा हजार ३०० कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यांना दिला. यात सर्वाधिक ७७३ कोटी रुपयांचा निधी तमिळनाडू, तर त्याखालोखाल दिल्ली (६५१ कोटी रुपये) आणि महाराष्ट्राला (५९२ कोटी रुपये) दिले होते.

या निधीतून सर्व राज्यांना ४०८ लाख रुपयांचे एन ९५ मास्क, १६९ लाख रुपयांचे वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) आणि १,११५ लाख रुपयांच्या करोना प्रतिबंधासाठी म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या (एचसीक्यू) गोळ्या पुरविल्याची माहिती राज्यसभेतील प्रश्नोत्तरांमध्ये देण्यात आली आहे. २४ जानेवारी २०२१ पर्यंत केलेल्या खर्चाच्या माहितीचा यात समावेश केलेला आहे.

लसीकरणासाठी  १,३९२ कोटी रुपये

केंद्रीय आरोग्य विभागाने सुमारे ३५० कोटी रुपयांच्या १६५ लाख लशींच्या मात्रा मागविल्या आहेत. यात ‘कोविशिल्ड’च्या ११० लाख आणि ‘कोव्हॅक्सीन’च्या ५५ लाख मात्रांचा समावेश आहे. देशभरातील सुमारे ९६ लाख आरोग्य कर्मचारी आणि सुमारे ७८ लाख अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुमारे १,३९२ कोटी रुपयांच्या लशी वापरल्या जाणार असून लसीकरणासाठी ४८० कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्यात सुमारे ९ लाख ७८ हजार आरोग्य आणि सुमारे ५ लाख ९४ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तर  लसीकरणाकरिता ११ कोटी ९४ लाख रुपये खर्च येणार असल्याचे आरोग्य विभागाने मांडले आहे.

निधी कशासाठी?

  • राज्याला पुरविलेल्या निधीतील ३२ लाख रुपयांचे एन ९५ मास्क, १४ लाख रुपयांचे पीपीई आणि सुमारे ९७ लाख रुपयांच्या एचसीक्यूच्या गोळ्यांचा पुरवठा केला होता.
  • राज्याला ४,४३४ कृत्रिम श्वसनयंत्रणा पुरविल्या असून यातील ४,३३६ यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.
  • ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी सुमारे २२ हजार सिलेंडरही यामधून पुरविलेले आहेत, असे यात नमूद केले आहे.
  • आरटीपीसीआर चाचण्यांसाठीचे एक कोटी ५६ लाख संच केंद्राने देशभरात पुरविले आहेत. यातील सर्वाधिक २५ लाख ६५ हजार संच राज्याला दिले आहेत. त्या खालोखाल उत्तर प्रदेश १७ लाख  व राजस्थान १२ लाख  दिले आहे.