मुंबई : जोगेश्वरी येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय’ व विलेपार्ले येथील ‘डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालया’तील रुग्णांना दिवसातून दोन वेळा चहा-बिस्किटे, नाश्त्यासह दोन वेळचे जेवण देण्याकरिता पालिकेने कंत्राटदार नेमण्याचे ठरवले आहे. एका रुग्णासाठी अवघ्या ११५ रुपये २९ पैशांत हे खाद्यपदार्थ देण्यास एक कंत्राटदार पुढे आला असून ३३ महिन्यांकरिता पालिकेला ७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

जोगेश्वरी येथील टॉमा रुग्णालय व विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय या दोन रुग्णालयांत मिळून ७०० क्षमता आहे. या रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा, बिस्कीट देण्यासाठी महानगर पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक रुग्णामागे १२३ रुपये खर्चाचा अंदाज होता. एका कंत्राटदाराने ११५ रुपये २९ पैशांत रोजची थाळी पुरविण्याची तयारी दाखवली असून ३३ महिन्यांसाठी हे कंत्राट या कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका ७ कोटी ९८ लाख ९५ हजार रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, पालिका रुग्णालयातील रुग्णांना पूर्वी महानगरपालिकेतर्फे जेवण पुरवले जात होते. मात्र काही वर्षांपासून खासगी कंपन्यांकडून शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कमी किमतीत होणाऱ्या या अन्नपुरवठ्याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित झाले आहेत.