१०० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी

पश्चिम उपनगरांमधील धोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात पुलांची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या पुलांच्या पुनर्बाधणीच्या कामाच्या तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली. आता लवकरच या पुलांच्या पुनर्बाधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईमधील पादचारी आणि उड्डाण पुलांच्या संरचनात्मक तपासणीसाठी पालिकेने तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली होती. तांत्रिक सल्लागारांनी पुलांच्या तपासणीचे काम सुरू करुन अहवाल तयार केले होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सल्लागारांच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या दुर्घटनेनंतर शहर भागातील पुलांच्या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागाराला काढून त्याच्याजागी नव्या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर पालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व पुलांची पुन्हा सरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश तांत्रिक सल्लागारांना दिले होते.

तांत्रिक सल्लागारांनी जुहूतारा रोडवरील वाहतूक पूल, सांताक्रूझ पूर्व येथील हंसभूग्रा पाइप लाइन रस्त्यावरील पूल, धोबीघाट मजास नाल्यावरील पूल, मेघवाडी जंक्षन नाल्यावरील पूल, पिरॅमल नाल्यावरील नालाड ईन ऑर्बिट मॉलजवळचा पूल, लिंक रोडवरील मालाड डी’मार्ट येथील पूल व रतन नगर बोरिवली येथील दहिसर नदीवरील पूल धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले. कोणताही दुर्घटना घडू नये म्हणू हे सातही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुलांची पुनर्बाधणी युद्धपातळीवर हाती घेण्याचा निर्णय घेत पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदारांची नियुक्ती करुन या पुलांची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने मंजूर केला. त्यामुळे आता तातडीने हे धोकादायक पूल पाडून नव्या पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. या पुलांची पुनर्बाधणी सहा महिन्यांमध्ये करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली आहे. कंत्राटदाराने नियोजित मुदतीत पुलांची पुनर्बाधणी न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.