गेली तब्बल दोन तप संक्रमण शिबिरात व्यथित केल्यानंतर आता ‘म्हाडा’ने ‘अपात्र’ म्हणून शिक्का मारलेल्या सात कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला आहे. उन्हाचा तडाखा आणि थंडीचा कडाका सोसत सात कुटुंबातील ३४ जणांनी रस्त्यावरच संसार मांडला आहे.
परळमधील भगवानदास भोगले चाळ १९८८ मध्ये पडली आणि विश्राम बाबाजी रावले कुटुंबियांची घाटकोपरच्या संक्रमण शिबिरात रवानगी करण्यात आली. तेथील एकूण परिस्थितीला कंटाळल्यामुळे म्हाडा कार्यालयात खेटे घालून रावले परिवार २०१० मध्ये काळाचौकीच्या जिजामाता संक्रमण शिबिरात आले. त्याचप्रमाणे माझगावमधील श्रीनिवास बिल्डिंग धोकादायक बनली. विजय बाळकृष्ण सावंत, मंगेश सहदेव गावडे यांच्यासह काही रहिवाशांची २००१ मध्ये विशेष बाब म्हणून जिजामाता नगरमधील संक्रमण शिबिरात सोय करण्यात आली. प्रकाश शंकर चव्हाण, गीतादेवी अनिल ठाकूर, रघुनाथ शंकर त्रिंबककर, सत्यवान विश्राम परुळेकर यांनाही याच संक्रमण शिबिरात घर देण्यात आले.
गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळ ही मंडळी येथेच वास्तव्यास आहेत. आता संक्रमण शिबिरातील इमारत क्रमांक १ मोडकळीस आल्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी म्हाडाने तब्बल ६२ रहिवाशांवर नोटीस बजावली. ३६ रहिवाशांना स्वान मिल, तर २२ रहिवाशांना धारावीमधील संक्रमण शिबिरात धाडण्यात आले.
संक्रमण शिबिरातील अपात्र रहिवाशांची म्हाडाने धारावीतील संक्रमण शिबिरात केली आहे. या सात कुटुंबियांना अपात्र ठरवून म्हाडाने धारावीची वाट दाखविली. मात्र पात्र रहिवाशी असल्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. पण म्हाडाचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत. आधी धारावीला जा, मग तुमची कागदपत्रे तपासून पात्र-अपात्रतेचा निवाडा करू, असा हट्ट म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी धरला आहे.
 या वाऱ्या करण्यापेक्षा संक्रमण शिबिरातील घर रिकामे करण्यापूर्वीच म्हाडाने निवाडा करावा आणि काळाचौकी परिसरातील संक्रमण शिबिरात घर द्यावे, अशी मागणी या रहिवाशांनी केली होती. परंतु म्हाडाचे अधिकारी एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे कुडकुडणाऱ्या थंडीत म्हातारे आई-वडिल आणि मुलांसह रस्त्यावर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
तसेच मुलांच्या शाळेचाही प्रश्न निर्माण झाल्याने ही कुटुंबे हवालदील झाली आहेत.