शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपूत्र बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सात तास चौकशी केली. विशेष म्हणजे ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे सांगत ही चौकशी समाधानकारक झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर ते आज दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं होत की, “मला नोटीस मिळाली असून ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मी आलो आहे. मला ईडीकडून कोणतेही प्रश्न पाठण्यात आलेले नाहीत. मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन. हे कदाचित कोहिनूर इमारतीसंबंधी असावं”. यानंतर त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. ईडीने केलेल्या चौकशीने आपण समाधानी असल्याचे म्हणत आपल्याला चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. मात्र मनसे अशा नोटिसीला भीक घालत नाही अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना दिली आहे.