दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक

मुंबई : युरेनियमचा बेकायदा साठा मिळवून तो चढ्या किमतीस विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी रात्री अटक केली.

जिगर पंड्या, अबु ताहीर अशी आरोपींची नावे आहेत. मानखुर्दमधील एका कारखान्यात या दोघांनी दडवलेला तब्बल सात किलो १०० ग्रॅम युरेनियमचा साठा एटीएसने जप्त के ला. हे युरेनियम ९० टक्के  नैसर्गिक/शुद्ध असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २१ कोटींहून अधिक असावी, असा अंदाज आहे.

जिगर, ताहीर ‘एमबीए’ आहेत. गेल्या वर्षभरापासून ते युरेनियमचा साठा विकण्यासाठी अत्यंत गुप्तपणे ग्राहक शोधत होते. बाजारात त्यांनी काही विश्वाासू व्यक्तींना या साठ्याचा व्यवहार २५ कोटी रुपयांपर्यंत होईल, असेही सांगितले होते. गुप्तता पाळूनही एटीएसचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या खबऱ्याने ही बाब हेरली. त्याआधारे भालेकर, साहाय्यक निरीक्षक प्रशांत सावंत, अंमलदार मुल्ला, धावले, पांडे यांनी माहितीची खातरजमा करून १४ फे ब्रुवारीला जिगरला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत ताहीरचे नाव उघड झाले. ताहीरच्या वडिलांचा मानखुर्दच्या मंडाले परिसरात कारखाना आहे. गोदामवजा कारखान्यातील लाकडी कपाटात युरेनियमचा साठा दडविल्याचे दोघांनी सांगताच एटीएस पथकाने तो जप्त के ला. एटीएसचे उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या आदेशानुसार जप्त के लेला पदार्थ युरेनियमच आहे हे स्पष्ट करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रात (बीएआरसी) चाचणीसाठी पाठवण्यात आला. बीएआरसीने नमुना तपासून तो ९० टक्के  नैसर्गिक युरेनियम असल्याचे एटीएसला कळवले. हा अहवाल हाती येताच तीन महिन्यांनंतर जिगर, ताहीर यांना अटक करण्यात आली.

आरोपींना न्यायालयाने १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हा पदार्थ युरेनियमच आहे, हे आरोपींना कसे समजले? त्यांनी हा साठा कोठून प्राप्त के ला, याआधी त्यांनी अशाप्रकारे युरेनियमची विक्री के ली आहे का? यासोबत युरेनियमच्या साठ्याचा घातपातासाठी वापर होणार होता का? आदी प्रशद्ब्राआधारे तपास सुरू असल्याची माहिती लांडे यांनी दिली. जिगर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी कं पनीत नोकरी करतो. तर ताहीर हा आयात-निर्यात व्यवसायिक आहे.

या कारवाईनंतर अ‍ॅटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्प्लोरेशन अ‍ॅण्ड रिसर्चच्या विभागीय संचालकांनी तक्रार दिली. त्याआधारे अणुऊर्जा कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदवल्याची माहिती एटीएस अधीक्षक राजकु मार शिंदे यांनी दिली.

तीन महिने झुलवून कारवाई

जप्त के लेला पदार्थ युरेनियमच आहे हे बीएआरसीच्या चाचणीतून स्पष्ट होणार होते. त्याआधीच जिगर, ताहीर यांची अटक फायदेशीर ठरली नसती. चाचणीसाठी बराच अवधी लागेल, याची कल्पना असल्याने तोवर या संशयितांना झुलवत ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे जप्त पदार्थाचा नमुना चाचणीसाठी पाठवल्याची चाहूल त्यांना लागणार नाही याची काळजी घेतली. त्यांना नियमितपणे एटीएस कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. प्रत्येक वेळी इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्यांना सोडले जात होते. कारवाई होणार नाही, अशी परिस्थिती उभी के ली गेली. त्यामुळे आरोपी निश्चिांत झाले. ताहीरने तर बहिणीच्या लग्न कार्यालयासाठी परराज्यातील दौरा के ला, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोग्यास घातक

किरणोत्सारी गुणधर्म आणि आरोग्यास घातक असल्याने शासनाने युरेनियमला प्रतिबंधित पदार्थ म्हणून जाहीर के ले. झारखंड, आंध्र प्रदेश येथे युरेनियमच्या खाणी होत्या. त्यापैकी झारखंड येथील युरेनियम उत्खनन शासन नियंत्रणात सुरू आहे. युरेनियमचा वापर अणुऊर्जा प्रकल्प, अणू संशोधनासह क्ष-किरण शास्त्राशी (रेडिओलॉजी) संबंधित उपकरणांमध्ये होतो.

 

भंगारात युरेनियम?

या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यावर गुंतागूंत वाढवणारी माहिती एटीएसच्या हाती लागली. जप्त केलेले युरेनियम आरोपी ताहीर याच्या वडिलांच्या कारखानावजा गोदामात काही वर्र्षांपूर्वी भंगार सामानातून आले होते. घन स्वरूपातील युरेनियमच्या सळ्या जपून ठेवण्यात आल्या. टाळेबंदीत ताहीरची कारखान्यात ये-जा वाढली. त्याच्या हाती या सळ्या लागल्या. त्याने अधिक माहिती घेतल्यावर ते युरेनियम असून त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे, याची जाणीव त्याला झाली. त्यानंतर त्याने मित्र जिगर याला ही बाब सांगून युरेनियम विकण्याचा प्रयत्न केला, असे तपशील एटीएसच्या हाती लागले आहेत. त्याची खातरजमा सुरू आहे. मात्र जर हे खडे काही वर्षांपूर्वी भंगार सामानातून प्राप्त झाले असतील तर या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आव्हान ठरू शकेल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.