वृद्धापकाळाने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबटय़ा बचाव केंद्रातील (रेक्सू सेंटर) सात बिबटय़ांचा एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (सीझेडए) वार्षिक अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे. शिवाय वर्षभरात उद्यानाच्या बंदिस्त अधिवासातील १८ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. सात बिबटय़ांमधील बहुतांश बिबटय़ांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव केंद्र आणि व्याघ्र-सिंह सफारीला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाचा दर्जा दिला आहे. येथील बिबटय़ा बचाव केंद्रामध्ये ठिकठिकाणाहून वाचविण्यात आलेल्या बिबटय़ांचे आणि अनाथ सापडलेल्या बछडय़ांचे पालनपोषण केले जाते. २०१६-१७ या वर्षांत या बचाव केंद्रामध्ये १४ बिबटे वास्तव्यास होते. मात्र २०१७-१८ या कालावधीत केंद्रातील ५ मादी आणि २ नर बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील शेर-ए-पंजाब वसाहतीमधून पकडलेल्या मादी बिबटय़ाचा इतर बिबटय़ाशी झालेल्या झटापटीमुळे मृत्यू झाला होता. सात मृत बिबटय़ांमध्ये या मादी बिबटय़ाचा समावेश असून इतर सहा बिबटय़ांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.  बिबटय़ांशिवाय उद्यानाच्या बंदिस्त अधिवासातील ४ चितळांचा आणि ५ चौसिंघांचा मृत्यू झाल्याचे ‘सीझेडए’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मृत पावलेल्या सात बिबटय़ांपैकी सहा बिबटे हे बचाव केंद्रामधील असून त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. साधारण बिबटय़ांची जगण्याची क्षमता सुमारे १५ वर्षांची असून मृत पावलेले बिबटे हे १९ ते १६ वर्षांपर्यंत बचाव केंद्रामध्ये जगल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मृत बिबटय़ांच्या शवविच्छेदनाची विश्वासार्हता जपण्यासाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासारख्या त्रयस्थ संस्थेकडून शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आल्याचे पेठे म्हणाले

सध्या बचाव केंद्रांमध्ये ११ बिबटय़ांचे वास्तव्य आहे. त्यामध्ये सूरज-तारा या दोन बछडय़ांचा आणि आरे वसाहतील मानव-बिबटय़ा संघर्षांमधून पकडण्यात आलेल्या नर बिबटय़ाचा समावेश आहे. याशिवाय ३ सिंह, ७ वाघ आणि ४ गंज ठिपके मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट), १८ चौसिंघे, ३८ चितळ, २ नील गाईंचे वास्तव्य बंदिस्त अधिवासात आहे.