मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार तज्ज्ञ समिती स्थापन

मुंबई : संसर्गजन्य आजारांप्रमाणेच मधुमेह व उच्च रक्तदाबासारख्या असंसर्गजन्य आजारांचा वाढता प्रभाव रोखणे तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य यंत्रणा सुदृढ करणे नितांत गरजेचे बनले आहे. वाढते बालमृत्यू तसेच साथीचे आजार आदींचा विचार करून आरोग्य विभागाचे सर्वागिण बळकटीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार सात सदस्यांच्या तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुका स्तरावरीव आरोग्य यंत्रणेपासून आरोग्य संचालनालय स्तरावरील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी स्वतंत्र प्रशासकीय संवर्ग निर्माण करण्यात येणार आहे. सध्या आरोग्य विभागात वरिष्ठ पातळीवरील नियुक्तीबाबत सावळागोंधळ असल्यामुळे वरिष्ठ पातळीवरील पदांच्या नेमणुकांबाबत निश्चित असे धोरण राबविता येत नाही. जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी या दोन संवर्गातून पदोन्नती देण्यावरून न्यायालयीन लढाईत वर्षांनुवर्षे पदोन्नती रखडून आरोग्य विभागाच्या कामाचा खेळखंडोबा होतो. त्यातही ज्या डॉक्टरांकडे शल्यकौशल्य असते त्यांना प्रशासकीय कामात गती नसते. त्याचाही परिणाम आरोग्य यंत्रणेचे कामकाज राबवताना दिसून येतो. त्यामुळे आरोग्य विभागाची कार्यक्षमता वाढवणे, दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवेचा आकृतीबंध निर्माण करण्यासाठी उपाययोजना तयार करून त्याबाबतचा कृती अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना ३ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्यानुसार तालुका पातळीपासून संचालक स्तरापर्यंत आरोग्य व्यवस्थेत स्वतंत्र प्रशासकीय संवर्ग निर्माण करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुभाष ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सात तज्ज्ञांची एक समिती १७ जुलै रोजी स्थापन करण्यात आली.

राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे या समितीचे प्रमुख सदस्य असून, त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडे काही महिन्यांपूर्वी देशपातळीवर आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासंदर्भात एक सादरीकरण केले होते. या सादरीकरणाची दखल घेऊन तामिळनाडू व ओदिशा यांनी आपल्या राज्यात आरोग्य व्यवस्थेसाठी स्वतंत्र  यंत्रणा निर्माण केली. महाराष्ट्रातही अशीच यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

मोठे आव्हान : राज्यात एकूण १०,५८० उपकेंद्रे, १,८१४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३० खाटांची ३६१ ग्रामीण रुग्णालये, ५० खाटांची ५८ तर १०० खाटांची २८ उपजिल्हा रुग्णालये, चार सामान्य रुग्णालये, २३ जिल्हा रुग्णालये, चार मनोरुग्णालये, दोन संदर्भ रुग्णालये, १२ स्त्री रुग्णालये, चार क्षयरोग रुग्णालये, चार कुष्ठरोग रुग्णालये अशी मोठी आरोग्य यंत्रणा आहे. जवळपास १६ हजार पदे आरोग्य विभागात असून आरोग्य यंत्रणेतील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून २६,३५३ खाटा आहेत. आरोग्याचा अर्थसंकल्प सुमारे साडेतेरा हजार कोटी रुपये असून तालुका पातळीपासून आरोग्य संचालनालय स्तरापर्यंत उपचार व प्रशासन यात संबंधित अधिकाऱ्यांमध्ये कौशल्य व समन्वय साधणे हे प्रमुख आव्हान आहे.