अलगीकरण, विलगीकरण कक्षांसाठी व्यवस्था

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाची लागण होणाऱ्या तसेच करोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरणात जाणाऱ्या नागरिकांवर उपचारासाठी खाटांचा तुटवडा भासू नये, यासाठी चक्क पुठ्ठय़ापासून बनवलेल्या खाटांचा पर्याय पुढे आला आहे. अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने पुठ्ठय़ापासून सुमारे सात हजार खाटा बनवण्यात येत असून त्यापैकी जवळपास पाच हजार खाटा आधीच मुंबईतील अलगीकरण, विलगीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे करोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची, तसेच लक्षणे नसलेल्या मात्र करोनाची बाधा झालेल्यांसाठी मुंबईत ठिकठिकाणी अलगीकरण आणि विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. बाधित, संशयितांची वाढती संख्या लक्षात घेऊन या केंद्रांमधील खाटांची क्षमता एक लाख करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने लोखंडी खाटा तात्काळ उपलब्ध होणे शक्य नाहीत. तसेच त्यासाठी येणारा खर्चही मोठा आहे.

खाटांचा तुटवडा लक्षात घेऊन वापी येथील क्राफ्ट पेपर आणि अन्य तत्सम उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या आर्यन पेपर ग्रुपने पुठ्ठय़ापासून खाटांची निर्मिती केली. करोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देण्याच्या उद्देशाने कंपनीने या खाटांची निर्मिती केली असून नौदल, मुंबई महापालिका आणि अन्य काही संस्थांना मिळून पुठ्ठय़ाच्या एक हजार खाटा मदत स्वरुपात दिल्या आहेत.

या खाटा पूर्णपणे घडी करून ठेवता येतात. खाटेसाठी पुठ्ठय़ाचे साचे बनविण्यात आले असून ते एकमेकांमध्ये अडकविल्यानंतर खाट तयार करता येते. अवघ्या काही मिनिटांमध्ये ही खाट तयार होते. लोखंडी खाटेच्या तुलनेत पुठ्ठय़ाच्या खाटेची किंमतही कमी आहे. पुठ्ठय़ावर रासानिक द्रव्य लावण्यात आले आहे. त्यामुळे पाण्यापासून पुठ्ठय़ाचे संरक्षण होते. परिणामी पाण्यामुळे ही खाट ओली होण्याचा धोका नाही. कमी वेळात मोठय़ा प्रमाणावर या खाटांची निर्मिती करणे शक्य आहे, असा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे.

आतापर्यंत मुंबईतील विविध ठिकाणच्या अलगीकरण, विलगीकरण कक्षामध्ये पुठ्ठय़ाच्या तब्बल पाच हजार खाटा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आणखी दोन हजार खाटा लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. करोनाची साथ ओसरल्यानंतर खाटांच्या पुठ्ठय़ावर पुनप्र्रक्रिया करून कागद निर्मिती करता येऊ शकेल. त्यामुळे या खाटा पर्यावरणस्नेही आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे.

काही तरी वेगळी मदत करण्याच्या हेतूने पुठ्ठय़ापासून खाट तयार करण्यात आली. या खाटांचा वापर चार ते सहा महिने सहज वापर करता येईल. रासायनिक द्रव्यामुळे पुठ्ठय़ावर पाण्याचा परिणाम होत नाही. आतापर्यंत नौदल, मुंबई महापालिका आणि अन्य संस्थांना एक हजार खाटा मदत म्हणून दिल्या आहेत. वापर झाल्यानंतर या खाटांवर पुनप्र्रक्रिया करुन कागद निर्मिती करता येऊ शकेल.

-परम गांधी, संचालक, आर्यन पेपर ग्रुप