मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश
बृहन्मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या वांद्रे पश्चिम प्रभाग (एच वेस्ट) कार्यालयातून पाणी विभागाच्या सात हजार नस्ती गहाळ झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारे नस्ती ‘गायब’ होण्याची ही दुसरी वेळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकाराची तातडीने चौकशी केली जावी, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत.
आमदार आणि ‘भाजप’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी या गंभीर घटनेकडे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले होते. ‘नस्ती’ गहाळ होण्याच्या या प्रकाराची ‘विशेष तपास पथका’कडून चौकशी केली जावी, अशी मागणी अ‍ॅड. शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
२०१३ मध्ये इमारत प्रस्ताव विभागाच्या सहा हजारांहून अधिक नस्ती गहाळ झाल्या होत्या. महापालिका अधिकारी, विकासक आणि राजकीय नेते यांच्या आपापसातील लागेबांध्यातून या नस्ती गहाळ झाल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र त्यावर कोणतीच हालचाल झाली नव्हती. गेल्या वर्षी मे महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य शासनातील दोन वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश नव्याने दिले होते. मात्र कोणतीही हालचाल झाली नसल्याचे नगर विकास विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
या संदर्भात माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते शरद यादव यांनी २०१३ मध्येच नस्ती गहाळप्रकरणी माहिती मागविली होती. नस्ती गहाळप्रकरणी पाणी विभागातील अभियंत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. एकूणच हे प्रकरण गंभीर असून यात आर्थिक घोटाळा असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडेही तक्रार दाखल करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान नस्ती गहाळप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त मेहता यांनी सांगितले.