देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) विविध सामाजिक संघटनांना रक्तदान शिबिरं घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई शहरातील विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी एसबीटीसीने धार्मिक संस्था, ना नफा-ना तोटा तत्वावर चालणाऱ्या संस्था, कॉर्पोरेट्स, सरकारी कार्यालये आणि गृहसंस्थांना रक्तदान शिबिरं आयोजित करुन रक्तसंकलन वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीनंतर सुरू होणारी आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत राहणारी रक्त युनिटची कमतरता ही आता नेहमीची वार्षिक बाब बनली आहे. या काळामध्ये दरवर्षी येणाऱ्या सुट्ट्यांचा हा परिणाम असून ही समस्या सोडवण्यासाठी रक्त संकलनाचे योग्य नियोजन गरजेचे असल्याचे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

एसबीटीसीचे अरुण थोरात म्हणाले, या काळात महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने रक्ताचा साठा संपला आहे. शहरात सध्या ४ ते ५ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. आमच्याकडे सर्व रक्तपेढ्यांचा मिळून ४,५०० युनिट इतका साठा उपलब्ध आहे. तर मुंबईची रोजची गरज सुमारे ८०० ते ९०० युनिट इतकी आहे. इतर महिन्यांमध्ये आमच्याकडे ७,००० ते १०,००० युनिटचा एकत्रित साठा उपलब्ध असतो.

धार्मिक संघटना आम्हाला रक्तदान शिबिरं घेण्यासाठी मदत करतात, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाकडूनही रक्तदान शिबिरं घेतली जातात आणि सुमारे ६,००० युनिट्स रक्त संकलन करतात अशी माहितीही यावेळी थोरात यांनी दिली.