20 October 2020

News Flash

करोनाकाळात रक्ताचा मोठा तुटवडा

थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या कुटुंबीयांची वणवण

थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या कुटुंबीयांची वणवण

मुंबई: करोना साथीच्या काळात रक्तदान शिबिरे आणि दात्यांचा ओघ आटल्याने शहरात पुन्हा मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी नियमितपणे रक्ताची गरज भासणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्ताच्या कुटुंबीयांना रक्तासाठी वणवण करावी लागत आहे.

जोगेश्वरी येथील पाच वर्षांच्या आर्यन पांडेला थॅलेसेमियाचा आजार असून दर महिन्याला रक्त चढवावे लागते. ९ ऑक्टोबरला त्याला रक्त चढविण्यासाठी मी घेऊन गेले. परंतु रक्त नसल्याने रुग्णालयाने परत पाठविले. पुन्हा ११ ऑक्टोबरला गेले तरी रक्त नव्हते. त्याची हिमोग्लोबीनची पातळी सहापर्यंत कमी झाली होती.

गेले तीन दिवस आम्ही रक्त मिळविण्यासाठी रक्तपेढय़ांपासून दाता शोधण्यासाठी फिरत आहोत. शेवटी माझ्या पतीच्या कंपनीतील एक जणांनी मंगळवारी रक्तदान केले. त्यामुळे आता आर्यनला बुधवारी रक्त चढविले जाईल.

करोना सुरू झाल्यापासून अनेकदा आम्ही दाता शोधूनच रक्त चढविले आहे. गेल्या महिन्यात फक्त रक्त उपलब्ध होते. रुग्णालयात आर्यनसारख्या अनेक मुलांची हीच अवस्था आहे. मंगळवारी तर २२ जणांपैकी केवळ आठच जणांना रक्त चढविले. बाकी सर्वांना घरी पाठविले, असे आर्यनची आई पूजा पांडे यांनी व्यक्त केले.

आर्यनप्रमाणे ३५ मुलांना गेल्या काही महिन्यांपासून रक्त मिळण्यासाठी अडचण येत असल्याने आम्ही दाते शोधतो. रक्तदान होत नसल्याने रुग्णालयात रक्त उपलब्ध नाही. यातील ज्यांचे हिमोग्लोबीन अत्यंत कमी आहे. त्यांना प्राधान्याने रक्त चढविले जाते. त्यामुळे रक्तदानाची खूप मोठी गरज असल्याचे समाजसेवक राहुल साळवे यांनी सांगितले.

रक्तपेढय़ांकडून रक्ताची मागणी

गणपती उत्सवाच्या निमित्ताने काही सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरे घेतली होती. त्यामुळे सप्टेंबरपर्यत पुरेल इतका साठा झाला होता. परंतु आता रक्तदान शिबिरेच होत नाही. करोनाच्या भीतीने दातेही रक्तदान करण्यास येत नाही. त्यामुळे खूप मोठा तुटवडा मुंबईत निर्माण झाला आहे. रक्तपेढय़ांमध्येही रक्त उपलब्ध नाही. त्यामुळे आम्हाला आता रुग्णांच्या नातेवाईकच नव्हे तर रक्तपेढय़ांकडूनही रक्ताची मागणी करणारे फोन येत आहेत.  असा तुटवडा या आधी कधीच अनुभवला नाही, असे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी मांडले.

‘शिबिरांचे आयोजन करा’

राज्यातही रक्तसंकलनात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने ऑक्टोबरमध्ये अधिक तुटवडा भासण्याचा संभव असल्याने नवरात्रीच्या काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तकेंद्र प्रमुखांना दिल्या आहेत.  निवासी संकुलांनी पुढाकार घेत संकुलाच्या आवारातच रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास मोठय़ा प्रमाणात रक्त उपलब्ध होऊ शकेल आणि दातेही पुढे येतील. संकुलांनी जवळील रक्तपेढीची मदत घेतल्यास संसर्ग होणार नाही, याची सर्व प्रकारे काळजीही घेतली जाईल, असे शेट्टी यांनी सूचित केले आहे.

प्रमुख रक्तपेढय़ांमधील उपलब्ध स्थिती

रक्तपेढी                             ए (पॉझिटिव्ह)                 बी(पॉझिटिव्ह)    एबी(पॉझिटिव्ह)         ओ(पॉझिटिव्ह)

जे.जे. रुग्णालय.                         १२                                ५                             ४                           १०

जी.टी. रुग्णालय                          ३                                 ३                            १                              १

कूपर रुग्णालय.                           ६                                 २                            ०                              ०

लो. टिळक रुग्णालय(शीव)       १५                                  १५                          १०                           १०

वाडिया रुग्णालय                       ३                                      ८                           २                           ४

राजावाडी रुग्णालय                    २                                     १                           ०                            ३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:38 am

Web Title: severe shortage of blood during the corona period zws 70
Next Stories
1 बॉलिवुडमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका
2 शेतकऱ्याला साडेनऊ लाखांचा ऑनलाइन गंडा
3 प्रभाग समिती निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप आमने-सामने
Just Now!
X