दरवर्षी पावसाळा येतो आणि तत्पूर्वी पालिकेला नाल्यांची आठवण होते. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर अशा तीन टप्प्यात नालेसफाई केली जाते असा दावा पालिका अधिकारी वारंवार करीत आहेत. त्याचीच री आता राजकारणीही ओढू लागले आहेत. मात्र पावसाळ्यानंतर मुंबईमधील कुठल्याच नाल्यांची साफसफाई होताना दिसत नाही. इतकेच नव्हे तर कंत्राटदारांचे कामगार नाल्याकाठी कुठेच दिसतही नाहीत. मग वर्षभर नालेसफाई होते असा दावा पालिका आणि राजकारणी कसा करू शकतात हा प्रश्न आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये नाल्याकाठी प्रचंड प्रमाणात झोपडय़ा उभ्या राहिल्या. या झोपडय़ा उभ्या राहात असताना कुणी नाही पाहिल्या. पण २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या अस्मानी संकटाने अवघी मुंबापुरी हादरली आणि अनेक भागात पाणीच पाणी झाले. मुंबईत पुरस्थिती निर्माण झाली आणि त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर सरकार आणि पालिका जागी झाली अन् मुंबईतील नद्यांचे नाले झाल्याचा साक्षात्कार झाला. मग ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाअंतर्गत नदी-नाल्यांची सफाई, रुंदीकरण, खोलीकरण, उदंचन केंद्र उभारण्यासाठी कोटय़वधी खर्च सुरू झाला. दरवर्षी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला जातो, अगदी तसेच पण पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे मोठय़ा आनंदाने हाती घेण्यास सुरुवात झाली. किंबहुना नालेसफाई हा पालिका अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारण्यांचा आवडता विषय बनून गेला.

दरवर्षी सफाई करूनही नाल्यांमधील गाळाचा अंत होत नाही यातच सर्व काही दडलेले आहे. नाल्यांकाठी मोठय़ा प्रमाणावर झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. या झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांनी नाल्यांची चक्क कचराकुंडी केली आहे. घरात नकोशा झालेल्या वस्तू थेट नाल्यामध्ये भिरकावण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षभर नाल्यांमध्ये कचरा साचतो आणि तो गाळ म्हणून उपसला जातो. काही ठिकाणी काठावर उभी असलेली गोदामे, कारखान्यांमधूनही नदी-नाल्यांचा वापर कचराकुंडीसारखाच केला जात आहे. या प्रकारांना आवर घालण्याची नितांत गरज आहे. मुंबईमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली आहे. मग नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी क्लीन अप मार्शलच्या धर्तीवर का व्यवस्था करण्यात येत नाही असा प्रश्न निर्माण होतो.

पावसाळा जवळ आला की निविदा काढायच्या आणि राजकारण्यांच्या मंजुरीने कंत्राटदारांच्या खिशात कंत्राटे टाकायची असा परिपाठ गेली अनेक वर्षे चालत आला आहे. केवळ शिवसेनाच नव्हे तर अगदी भाजपच्या नगरसेवकांचीही त्याला मंजुरी होती. कंत्राटदार जसे पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांबाहेर घुटमळायचे, तसेच ते भाजपच्या गटनेत्यांच्या कार्यालयाबाहेरही दिसायचे. केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षनेते आणि अन्य राजकीय पक्षांच्या गटनेत्यांच्या भेटीगाठीही घेण्यास कंत्राटदार विसरत नव्हते. या भेटीगाठींमध्ये नेमके काय घडत होते ते कंत्राटदार आणि राजकारणीच जाणो. पण आता युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याने नालेसफाई प्रकरणात शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा खटाटोप भाजपने सुरू केला आहे.

नालेसफाईची कामे सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नगरसेवकांच्या लवाजम्यासह नाल्यांची पाहणी करीत आले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाची खप्पा मर्जी होऊ नये म्हणून पालिकेचे वरिष्ठ अधिकारीही या ताफ्यात सहभागी होत नालेसफाईच्या कामाची माहिती देण्याचे काम करू लागले. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि मोजक्या ठिकाणी स्वच्छ झालेल्या नाल्याच्या पाहणीनंतर समाधान व्यक्त करीत दौऱ्याची सांगता होत आली. पण दोन वर्षांपूर्वी चौकशीअंती नालेसफाई घोटाळा उघडकीस आला आणि पालिका हादरली. गाळ वाहून नेण्यासाठी वापरलेल्या वाहनांच्या नोंदीमध्ये हेराफेरी आढळून आली आणि प्रशासनाने दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांसह तीन मुकादम, सहा दुय्यम अभियंते आणि चार साहाय्यक अभियंत्यांना निलंबित केले. तसेच कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्याची तयारी पालिकेने सुरू केली. पण कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली.

नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यामुळे कंत्राटदारांनी पालिकेचीच कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. छोटय़ा नाल्यांच्या सफाईसाठी काढलेल्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाने वारंवार निविदा जारी केल्या. पण कंत्राटदारांनी या कामांकडे पूर्णपणे पाठ फिरविली. त्यामुळे अखेर पालिकेने सामाजिक संस्थांच्या कामगारांच्या मदतीने विभाग कार्यालयांच्या पातळीवर छोटय़ा नाल्यांच्या सफाईची कामे हाती घेतली. गेल्या वर्षी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केलेल्या या प्रयोगाचे परिणामही चांगले दिसून आले.

आता पावसाळा जवळ आल्यामुळे नालेसफाईची कामे सुरू झाली आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे कंत्राटदारांनी याही वर्षी पालिकेची अडवणूक केली. पण पालिकेने छोटय़ा नाल्यांची सफाई विभाग पातळीवर सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौराही पार पडला आणि त्यांनी नालेसफाईबद्दल समाधान व्यक्त केले. पालिका निवडणुकीत नालेसफाईत घोटाळा झाल्याचा चिखल फेकला गेला. त्याचा समाचार या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतला. घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले नाही, हे आरोप केवळ निवडणुकीपुरते होते, असा उल्लेख करीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधी पक्षांचा उल्लेख न करता लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापाठोपाठ भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार पालिकेतील पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांसोबत नाल्याकाठी रवाना झाले. मीरा-भाईंदर वजनकाटय़ाच्या पावत्या बोगस असल्याचा आरोप करीत त्यांनी नालेसफाईचा खरपूस समाचार घेतला. करून दाखविणाऱ्यांनी आता नालेसफाई करून दाखवावी असा टोलाही त्यांनी हाणला.

नाल्याकाठच्या दौऱ्यांमुळे नजिकच्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे नालेसफाईवरून आरोप-प्रत्यारोपाचे नाटक रंगण्याच्या बेतात असताना छोटय़ा नाल्यांतून काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी प्रशासनाला चढय़ा दराने कंत्राटदारांना काम द्यावे लागले याबाबत मात्र कुणीच वाच्यता करताना दिसत नाही. राज्यात भाजपची सत्ता आहे, तर पालिकेत शिवसेना सत्तास्थानी विराजमान आहे. अप्रामाणिकपणे केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांमुळे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. पण त्याची तमा ना प्रशासनाला ना राज्य आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांना.

नालेसफाई हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणी आणि पालिका अधिकाऱ्यांचा आवडता विषय. आणि आजही तशीच परिस्थिती आहे. मात्र कडक शिस्तीच्या आयुक्तांमुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर कंत्राटदारांनी पाठ फिरविल्यानंतर नालेसफाईच्या कामांवरून परस्परांवर चिखलफेक करण्यात शिवसेना आणि भाजप नेते धन्यता मानू लागले आहेत. गाळ वाहून नेण्यात झालेल्या हेराफेरी प्रकरणात ठपका ठेवलेल्या कंत्राटदारांना शिक्षा व्हावी यासाठी ना सत्ताधारी आग्रही ना पहारेकरी. त्यामुळे नागरिकांनीही आता राजकारण्यांवर विश्वास ठेवून चालणार नाही. नाले कचऱ्याने भरणार नाहीत याची काळजी नागरिकांनीच घ्यायला हवी, नाल्यातून उपसण्यात येणाऱ्या गाळावरही नागरिकांनी लक्ष ठेवायला हवे, पडून राहिलेला गाळ वेळीच उचलला जावा यासाठी सातत्याने पालिकेकडे तक्रार करायला हवी. अन्यथा राजकारणी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग राहतील आणि मुसळधार पावसामुळे तुंबणाऱ्या नाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या पुरस्थितीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येईल. त्यामुळे नागरिकांनीच आता सावध होण्याची गरज आहे.