पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या नालेसफाईच्या कामात गाळ वाहून नेण्यासाठी एकच वाहन अनेक कंत्राटांसाठी विविध ठिकाणी वापरण्यात आल्याचे उघड झाले असून वजनकाटा पावत्या, वाहन नोंदणी पुस्तिका, वाहनफेऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. चौकशीदरम्यान नालेसफाईत मोठा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नालेसफाई संदर्भातील सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन या संबंधितांवर घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करण्याचे, तसेच कंत्राटदारांची देयके तात्काळ रोखण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. त्यामुळे संबंधित पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या छातीत धडकी भरली आहे. दरम्यान शिवसेनेकडून चौकशी समितीचा अहवाल दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामध्ये मुंबईत पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे अजय मेहता यांनी नालेसफाईच्या चौकशीचे आदेश देत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने मंगळवारी आपला १४५ पानांचा अंतिम अहवाल अजय मेहता यांच्याकडे सादर केला. मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी एकूण ३२ कंत्राटे देण्यात आली होती. या कामात ५६६ वाहनांनी सुमारे ५६,९५६ फेऱ्यांमध्ये ५,३४,१७९ घनमीटर गाळ क्षेपणभूमीवर वाहून नेला होता. यापैकी नऊ कंत्राट कामांची चौकशी करण्यात आली. त्यात २२६ वाहनांनी २६,८३८ फेऱ्या पूर्ण करीत २,३८,७००.६२ घनमीटर गाळ क्षेपणभूमीत वाहून नेल्याच्या नोंदी परिवहन नोंदणीवही, वाहन नोंदणी पुस्तिका, वजनकाटा पावती, व्हीटीएस रेकॉर्ड व अन्य अभिलेखांवरून आढळून आले. चौकशी समितीने क्षेपणभूमींना भेटी दिली असता कागदोपत्री नोंदणी नसल्यामुळे तेथे किती गाळ टाकला हे समजू शकले नाही. एकूण ३२ कंत्राटांमध्ये गाळ वाहून नेण्यासाठी वापरलेली ५० वाहने एकापेक्षा अधिक कंत्राटात कार्यरत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

घोटाळ्याची कारणे
’ वेगवेगळ्या कंत्राटांत एकाच वाहनाचा वापर ’ दोन वजनकाटय़ांवरून एक वाहन एकाच वेळी गेल्याच्या नोंदी ’दोन कंत्राटांत एकाच वाहनाच्या मोजमापात फरक ’वजनकाटय़ावरील पावत्यांमध्ये तारखेत फेरफार ’एका वाहनाच्या दिवसाला आठ फेऱ्यांची नोंदणी ’ त्रयस्थ लेखा परीक्षकांची नेमणूक नाही