आयुक्तांना लक्ष्य करण्यासाठी प्रस्तावात दिरंगाई; मुंबई जलमय होण्याची भीती
पावसाळा तोंडावर आला असताना नाल्यांतून उपसलेला गाळ टाकणार कुठे, असे प्रश्नचिन्ह उभे करीत शिवसेनेने शहरातील मोठय़ा नाल्यांतील गाळ उचलून कचराभूमीत टाकण्याचे कंत्राट रोखून धरले आहे. मुंबई जलमय झाल्यानंतर त्याचे खापर आयुक्तांवर फोडता यावे म्हणजे भाजपला शह बसेल, असा विचार करीत शिवसेनेने व्यूूहरचना केल्याचे दिसत आहे.
नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईमधील छोटय़ा नाल्यांची सफाई पालिकेच्या विभागीय कार्यालयांमार्फत करण्याचा, तर मोठय़ा नाल्यांच्या सफाईची कामे कंत्राटदारांना देण्याचा निर्णय घेतला. नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंत्राटदारांनी पालिकेबरोबर असहकार सुरू केला आहे. त्याचा प्रत्यय मुंबई शहरातील मोठय़ा नाल्यांसाठी तीन वेळा काढलेल्या निविदांच्या वेळी प्रशासनाला आला. चौथ्यांदा काढलेल्या निविदेस प्रतिसाद देणाऱ्या कंत्राटदाराला हे काम देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले. गाळ उपसून तो कचराभूमीत टाकण्याचे काम कंत्राटदाराला देण्याचा हा प्रस्ताव गेल्या आठवडय़ात स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. मात्र गाळ टाकणार कुठे असा मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेने हा प्रस्ताव रोखून धरला.
हा प्रस्ताव मागे ठेवताना मुंबईत पाणी तुंबले तर त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल अशी शेरेबाजी शिवसेनेचे नगरसेवक करीत होते.
मुंबईमधील कचराभूमी कचऱ्याने तुडुंब भरल्याने नाल्यांतील गाळ तेथे टाकण्यास परवानगी नाही. त्यामुळे कंत्राटदाराने हा गाळ मुंबईबाहेरील कचराभूमीत टाकावा आणि कचराभूमीचा पत्ता, संबंधित जमीन मालकाची परवानगी आदी माहिती प्रशासनाला द्यावी, अशी अट निविदेमध्ये घालण्यात आली होती. त्यानुसार हा गाळ ठाणे तालुक्यातील अडवली भुताली आणि ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी तालुक्यातील पाये गावातील भूखंडावर हा गाळ टाकण्यात येणार आहे. या भूखंड मालकाची परवानगीही कंत्राटदाराने घेतली आहे. असे असतानाही शिवसेनेने स्थायी समितीच्या बैठकीमध्ये गाळ कुठे टाकणार असे तुणतुणे वाजवत हा प्रस्ताव रोखून धरला.
हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर गेल्या गुरुवारपासून शहरातील नाल्यांच्या सफाईची कामे सुरू झाली असती. मात्र मुंबई जलमय झाल्याचे खापर आयुक्तांवर फोडता यावे यासाठी शिवसेनेने हा प्रस्ताव रोखून धरण्याचा अट्टहास केला.
आता पुन्हा बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या वेळीही शिवसेनेने हा प्रस्ताव रोखून धरल्यास पावसाळ्यात शहर भागातील नाले तुंबून सखल भाग जमलय होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शह-काटशह
मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होऊ घातली आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोप, एकमेकांना अडचणीत आणण्याचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तपदाची सूूत्रे अजोय मेहता यांच्या हाती दिल्यापासून शिवसेनेच्या छातीत धडकी भरली आहे. भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना वारंवार आयुक्तांविरोधात आरडाओरड करू लागली आहे.