नालेसफाई घोटाळ्याबाबतच्या चौकशी अहवालावरून नगरसेवकांनी सोमवारी पालिका सभागृहात गोंधळ घातला. सत्ताधारी शिवसेना-भाजपवर घोटाळ्याचे खापर फोडत काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला. मात्र नालेसफाईसाठी नियुक्त केलेल्या ५४ कंत्राटदारांची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना देण्यात आले असून या घोटाळ्यात दोषी आढळणारे अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा प्रशासनाने केल्यानंतर गोंधळावर पडदा पडला.
नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे चौकशी अहवालावरून स्पष्ट होत आहे. या भ्रष्टाचारात सत्ताधारी शिवसेना-भाजप सहभागी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सोमवारी सभागृहात केला. विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनाद्वारे सभागृहात या विषयावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान आंबेरकर यांनी ‘मातोश्री’चा उल्लेख केल्याने शिवसेना नगरसेवक खवळले. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी उपस्थित राहून निवेदन करावे, अशी मागणी आंबेरकर यांनी केली. मात्र ते सभागृहात न आल्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला.
कंत्राटदारांना पाठीशी घालण्यासाठी काँग्रेस गोंधळ घालत असल्याचा आरोप भाजपने केल्यामुळे विरोधकांचा भडका उडाला. शिवसेना-भाजपच्या विरोधात घोषणा करीतच काँग्रेस नगरसेवक थेट अजय मेहता यांच्या दालनात रवाना झाले. मेहता यांच्याकडे निवेदन सादर करून अधिकाऱ्यांना कडक शासन करण्याची तसेच दोषी कंत्राटदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी आंबेरकर यांनी केली. मेहता यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन नगरसेवकांना दिले.
काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतर नगरसेविका वकारुन्निसा अन्सारी सभागृहातच बसून होत्या. विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय आवडलेला नसल्यामुळे आपण सभागृहात बसून राहणार आहोत. पक्षाला जी कारवाई करायची असेल ती करू दे, असे त्या काँग्रेस नगरसेवकांना सांगत होत्या. पक्षादेश झिडकारल्यााने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.