देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या उभारणीवर आता गुप्तचर विभागाची नजर राहणार आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या एमएमआरडीए आणि पोलीस व गुप्तचर यंत्रणांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या सागरी सेतूच्या टप्प्यात भाभा अणुऊर्जा प्रकल्प, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल अशी अनेक संवेदनशील ठिकाणे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू हा भारतातला सर्वात मोठा आणि जगातल्या दोन क्रमांकाचा सागरी सेतू ठरणार आहे. या सेतूच्या उभारणीतील अडथळे दूर झाले असून सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला फटकारले होते. एवढय़ा मोठय़ा सागरी सेतूची उभारणी करण्यापूर्वी स्थानिक पोलिसांनाही विचारात घेण्यात आले नव्हते. केंद्राच्या पत्राची दखल घेऊन राज्य सरकारने सेतूच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त (संरक्षण) यांच्या नेतृत्वाखालील एक समिती स्थापन केली. त्यात केंद्रीय गुप्तवार्ता विभाग (आयबी), राज्य गुप्तवार्ता विभाग (स्टेट सीआयडी), मुंबई पोलीस आणि एमएमआरडीएच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सोमवारी झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत या सागरी सेतूच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याबाबत बोलताना समितीचे अध्यक्ष, अतिरिक्त पोलीस आयुक्त (संरक्षण) मधुकर पांडे यांनी सांगितले की, या सागरी सेतूचा मार्ग अनेक संवेदनशील ठिकाणांहून जाणार आहे, ज्यात भाभा अणुऊर्जा प्रकल्प, राष्ट्रीय तेल कंपन्या आदींचा समावेश आहे. त्यामुळे सेतूची उभारणी करताना या सर्वाची सुरक्षितता धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.