लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना कळसूत्री बाहुल्यांच्या कार्यक्रमाद्वारे लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतच्या निर्णयावर पालिका सभागृहात शिक्कामोर्तब झाले असून पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये कळसूत्री बाहुल्यांच्या कार्यक्रमातून लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या-वाईट स्पर्शाची जाणीव व्हावी, या दृष्टीने खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. पालिका शाळांतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाची माहिती द्यावी. त्यासाठी व्हच्र्युअल क्लासरूमचाही वापर करता येईल. त्याचबरोबर कळसूत्री बाहुल्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही चांगल्या-वाईट स्पर्शाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एका ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका सभागृहात केली होती. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शरीराच्या प्रत्येक अवयवाबाबत माहितीही द्यावी, असेही शीतल म्हात्रे यांनी या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.