मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अंधेरीतील फ्लॅटमधील सेक्स रॅकेट उघडकीस आणले असून तो फ्लॅट  माजी पोलीस आयुक्त व भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांचा असल्याचे कळल्यानंतर पोलीस आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा फ्लॅट इंडियाबुल्स कंपनीला भाडय़ाने दिल्याचे  सत्यपाल सिंह यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, दोन महिलांची या रॅकेटच्या जाळ्यातून सुटका केली आहे.
अंधेरीच्या एका सोसायटीत सेक्स रॅकेट असल्याची येथील रहिवाशांची अनेक दिवसांपासून तक्रार होती. तिची खातरजमा करून पोलिसांनी तेथे छापा मारला. यावेळी तेथे एक तरुण व दोन महिला आढळल्या. याप्रकरणी वकील शाह नावाच्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून  तो इंडियाबुल्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे कळते. पोलिसांनी वकील शाहला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास वर्सोवा पोलिसांना सोपवला असल्याचे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले.आपण चार वर्षांपूर्वीच हा फ्लॅट इंडियाबुल्स कंपनीला भाडय़ाने दिला असून दरम्यानच्या काळात तेथे गेलोही नाही, असा खुलासा सत्यपाल सिंह यांनी केला. कंपनीशी केलेला भाडेकरार येत्या सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याशिवाय, करारातील अटींचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिंह यांचा या प्रकाराशी  संबंध नसला तरी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या  सेक्स रॅकेट कसे सुरू होते, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.