माटुंग्यातील ससून औद्योगिक शाळेतील प्रकार

माटुंगा येथील ‘डेव्हिड ससून औद्योगिक शाळे’तील एका अल्पवयीन मुलावरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले असतानाच बालगुन्हेगारांसाठीच्या या सुधारगृहात मोठय़ा वयाच्या मुलांकडून कमी वयाच्या मुलांवर या प्रकारचे अत्याचार होण्याचे प्रकार सर्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलांची वयानुसार विभागणी नसणे, लैंगिक समुपदेशनाचा अभाव, सुरक्षेत हलगर्जी आदी कारणांमुळे बालसुधारगृहात दाखल झालेल्या लहान मुलांच्या कोवळय़ा मनांवर यामुळे गंभीर परिणाम होत असून त्यामुळे ही मुले आणखी गैरमार्गाकडे वळत असल्याचेही दिसून येत आहे.

माटुंग्यातील या सुधारगृहातील एका १७ वर्षीय मुलाने त्याच्यासोबत राहणाऱ्या लहान वयाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आले. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी याच संस्थेत मुलांनी मारहाण केल्याने एका १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता, पण इथे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलांवर काही मोठी मुले कायम हुकमत गाजवीत असतात. त्यांचे मोठय़ा मुलांकडून लैंगिक शोषण होण्याचे प्रकार तर येथे सर्रास होतात; परंतु मोठय़ा मुलांच्या दहशतीमुळे त्यांना वाचा फुटत नाही; परंतु बुधवारी एका मुलाने धाडस करून तक्रार दाखल केल्याने या प्रकाराला निदान वाचा तरी फुटली आहे.

माटुंगा रोड रेल्वे स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेली ही शाळा बालगुन्हेगारांची संस्था म्हणून परिचित आहे. इथे या मुलांच्या आयुष्याला योग्य वळण लागणे अपेक्षित आहे; परंतु तसे घडण्याऐवजी या मुलांवर विपरीत परिणाम आणि मानसिक आघात होत आहेत. सुधारगृहाची क्षमता ४०० मुलांची असून सध्या केवळ १३० मुले संस्थेत आहेत. मात्र, संस्थेत मुलांच्या निवासाच्या ठिकाणी १२ ते १५ आणि १५ ते पुढे अशी वयानुरूप विभागणी केली जात नाही. मुलांना सरसकट राहू दिले जात असल्याने लहान मुलांना वयाने अधिक असलेल्या मुलांच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. मोठय़ांची सटरफटर कामे  करून देण्याबरोबरच ती त्यांच्या लैंगिक वासनेची बळीही पडतात.

कालबाह्य़ अभ्यासक्रम

मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बाहेरच्या जगात आर्थिकदृष्टय़ा सक्षम होता यावे यासाठी छोटेमोठे व्यावसायिक अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. मात्र हे बहुतांश अभ्यासक्रम कालबाह्य़ आहेत, त्यामुळे मुलांना त्यात रस नसतो.

मुलांची सुरक्षा वाऱ्यावर

याशिवाय संस्थेतील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. जे कर्मचारी आहेत ते कामावरच हजर नसतात. अधीक्षक किंवा उपअधीक्षक ही पदे निवासी असूनही अनेकदा त्यांचा संस्थेत पत्ताच नसतो. या भोंगळ कारभाराचा फटकाही येथील मुलांना बसतो. आठ महिन्यांपूर्वी सुरक्षिततेकरिता म्हणून संस्थेच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते, मात्र संस्थेतील मुलांनी सीसीटीव्हीही फोडून टाकले आहेत.

लैंगिक समुपदेशन नाहीच

किशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या लैंगिक बदलांविषयी त्यांना माहिती देत त्यांचे समुपदेशन केले नाही तर त्यांच्यात समलैंगिकता रुजण्याची शक्यता असते; परंतु एकूणच संस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारचे कुठलेही प्रभावी समुपदेशन होत नाही.

अत्याचारांची मालिका

मे, २०१५ मध्ये पवईत पाकिटमारी करताना पकडण्यात आलेल्या १७ वर्षीय आमीर जमाल खान या मुलाचा अन्य मुलांनी मारहाण केल्याने मृत्यू ओढवला होता. या मुलांवर आणि संस्थेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळीही मुलांमधील हिंसक वृत्ती आणि लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

सुधारगृहातील मुले समाजातील इतर मुलांसारखे निकोपपणे जगतील यासाठी या संस्थांनी काम करण्याची गरज आहे; परंतु सरकारचे होणारे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांचे अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी कर्मचारी संख्या यामुळे मुलांची परवड होत आहे. आतापर्यंत या संस्थेमध्ये असे कित्येक प्रकार उघडकीस आले आहेत,

– प्रा. आशा वाजपेयी, टाटा सामाजिक विज्ञान संस्था