कुरारमधील एका महिलेला केटरिंगचे काम देण्याच्या बहाण्याने राजस्थानात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचे जबरदस्तीने लग्न लावून पुन्हा तिला सोडण्यासाठी कुटुंबीयांकडे दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. कुरार पोलिसांनी पीडितेची आरोपींच्या तावडीतून सुटका केली असून सहा जणांना अटक केली आहे.

विवेक जांगीड (२२), मुकेशकुमार जांगीड (३७), कृष्ण कुमार (३३), प्रवीणकुमार जांगीड (३३), कविता जाधव ऊर्फ सलमा अकबर भट्टी (३५), कुसुम ऊर्फ रेखा राजू शिंदे ऊर्फ रेखा दौलत निकम (४५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर पीडित महिला ३८ वर्षांची असून तिला चार मुले आहेत.

एक महिना कामाला गेल्यास चांगले पैसे मिळतील, अशी बतावणी करीत आरोपी कुसुमने पीडितेला प्रथम गुजरातमधील कोसंब येथे नेले. काही दिवसांनी तिला राजस्थान येथील झुनझुन जिल्ह्य़ातील एका गावात कृष्णकुमार नावाच्या व्यक्तीकडे नेले. तेथे दहा दिवस ठेवले. वेगवेगळ्या ग्राहकांना दाखविण्यात आले. यातील एकासोबत लग्न कर नाहीतर वेश्याव्यवसायाला लावू, अशी धमकी कृष्णकुमारने दिली. १८ नोव्हेंबरला तिचे जबरदस्तीने मुकेश कुमार याच्याशी मंदिरात लग्न लावून दिले. त्यानंतर एका वकिलाकडे नेऊन स्टॅम्प पेपरवर तिच्या जबरदस्तीने सह्य़ा घेतल्या. लग्नानंतर मुकेश कुमार याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने मुकेशच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुकेशने तिला जबर मारहाण केली. दुसऱ्या दिवशी त्याने पीडितेच्या मुलाला संपर्क करत दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले तरच आईला सोडू, असे धमकावले.

पीडितेच्या कुटुंबीयांनी कुरार पोलिसांशी संपर्क साधला. आरोपींच्या मोबाइल क्रमांकाचा माग काढून राजस्थानातील टोगरा-कलान गावातून साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एस. घार्गे यांच्या पथकाने पीडितेची सुटका केली. राजस्थानामधून सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले.