मुंबई : महिलांची लैंगिक छळवणूक ही केवळ चित्रपट उद्योगापुरती मर्यादित नाही, असे ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक अधिक धाडसी विषय घेऊन येतात व ते वास्तवाशी निगडित असता. चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असते. जे बाहेर घडते त्याचाच विचार यात असतो. महिलांची लैंगिक छळवणूक केवळ चित्रपट उद्योगातच होत नाही तर सगळ्या समाजातच होते. चित्रपटांनी नैतिकतेचे धडे दिले पाहिजेत अशी अपेक्षा बाळगणे योग्य नाही. चित्रपट म्हणजे बायबल नव्हे, त्यात तुम्हाला नैतिकता, चांगली मूल्ये शिकवली जाणार नाहीत. चित्रपट त्यासाठी नसतो. चित्रपटांनी मूल्यशिक्षण करावे असे वाटत असेल तर ती अपेक्षा चुकीची आहे.

कश्यप यांचा राजीनामा

मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज या संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय चित्रपट निर्माते अनुराग कश्यप  यांनी जाहीर केला. त्यांनी सांगितले की, संस्था स्थापन झाली तेव्हापासून मी सदस्य होतो. लैंगिक छळवणूक प्रकरणात दिग्दर्शक विकास बहल यांना पाठीशी  घातल्याचा जो आरोप झाला आहे त्यातून मुक्त होईपर्यंत मी पदावरून दूर होत आहे. गेल्या वर्षी फँटम फिल्मस्च्या एका महिला कर्मचाऱ्याचा बहल यांनी लैंगिक छळ केला होता. ते कश्यप व विक्रमादित्य मोटवने, मधू मंटेना यांचे कंपनी भागीदार आहेत. त्या महिलेने बहल यांच्यावर असा आरोप केला की, त्यांनी २०१५ मधील गोवा दौऱ्यात तिच्याशी गैरवर्तन केले.

कैलाश खेर यांच्यावर आरोप

गायक सोना मोहपात्रा यांनी कैलाश खेर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून त्यांनी म्हटले आहे, की पृथ्वी कॅफे येथे कैलाश खेर  यांना मी भेटले होते. त्या वेळी आमचे दोन्ही बँड एकत्र काम करणार होते. नंतर त्यांनी माझ्या मांडीवर हात ठेवून तू खूप  सुंदर आहेस,असे म्हणत होते. नंतरही ढाक्यात त्यांनी छळ सुरू ठेवला. तेथे कार्यक्रमस्थळी जाताना ते मला फोन करीत होते. मी फोन उचलला नाही तेव्हा त्यांनी आयोजकांना फोन करण्यास सांगितले व त्यांच्याकडे जाण्यास सांगितले. प्रतिक्रियेसाठी कैलाश खेर उपलब्ध होऊ शकले नाहीत.

गीतकार मुथु यांच्यावर श्रीपदाचा आरोप

चेन्नई : तामीळ चित्रपट उद्योगातील अनेक महिलांनी त्यांचा लैंगिक छळ झाल्याचे आरोप केले असून गायक चिन्मयी श्रीपदा हिने गीतकार वैरामुथु यांनी लैंगिक छळ केल्याचे म्हटले आहे.

श्रीपदा हिने ऑस्कर विजेते ए. आर. रहमान यांच्यासमवेत काम केले असून तिने म्हटले आहे, की कवी वैरामुथु यांनी २००५-०६ मधील परदेश दौऱ्यावेळी लैंगिक गैरवर्तन केले. वैरामुथु यांनी अलिकडेच वैष्णव संत अंदाल यांच्याविषयी बदनामीकारक विधाने केली होती. वैरामुथु यांनी सांगितले, की यापूर्वीही माझ्यावर अनेक आरोप झाले असून हा बदनामीचा कट आहे. प्रसिद्ध व्यक्तींची बदनामी करणे ही आता फॅशन झाली आहे. यात काळच सत्य सांगेल. श्रीपदा व काही पत्रकारांनी वैरामुथु यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून आरोप केले असून अनेक महिलांनी नाव न घेता तक्रारी केल्या आहेत. श्रीपदा हिने सांगितले, की काही मुलींचा किशोरवयीन अवस्थेत त्यांनी लैंगिक छळ केला. वैरामुथु यांनी हे सगळे खोटे आहे असे सांगितले.

सुहेल सेठवरही आरोप

भारतातील ‘मी टू’ मोहिमेच्या वावटळीत प्रख्यात लेखक सुहेल सेठ हेही सापडले आहेत. ऑगस्ट २०१० मध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून, एका महिलेने त्यांच्यावर ‘लाळघोटय़ा’ (क्रीप) असल्याचा आरोप केला आहे. आपण १७ वर्षांच्या असताना सेठ यांची ‘फॅन’ म्हणून ट्विटरवर त्यांना फॉलो करीत होतो. मात्र एकदा त्यांनी संदेश पाठवून त्यांच्यासोबत मद्यपान करण्याचे आमंत्रण दिले, तसेच आपल्याला लज्जा वाटेल असाही संदेश आपल्याला पाठवला, अशी कहाणी या अनामिक महिलेने अनिशा शर्मा यांच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केली आहे. सेठ यांनी मात्र हा आरोप नाकारला असून, त्यावेळी आपण परदेशात होतो असे म्हटले आहे.

गंभीर दखल  घ्यावी- मनेका गांधी

नवी दिल्ली :  उच्चपदस्थांकडून केल्या जाणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या आरोपांची दखल गंभीरपणे  घेतली जावी  कारण महिला याबाबत बोलण्यास घाबरत असतात, असे मत महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री व माजी संपादक एम.जे.अकबर यांनी पत्रकार असताना काही महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला होता, त्यावर मनेका गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, जे लोक अधिकारपदावर असतात ते लैंगिक छळाची कृत्ये करण्यास धजावतात. ते माध्यमांनाही लागू आहे. कंपन्यांमध्येही वरिष्ठ अधिकारी याला अपवाद नाहीत. जेव्हा महिला आरोप करतात तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. महिला त्यांच्यावरील अत्याचाराबाबत बोलण्यास घाबरतात कारण लोक काही बोलले तर त्यांचीच थट्टा करतात, त्यांच्या चारित्र्यावर शंका घेतात, पण आता त्या बोलू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाची चौकशी करून  कारवाई करणे आवश्यक आहे.

तक्रारी नोंदवणे महत्त्वाचे राष्ट्रीय महिला आयोगाचे मत

नवी दिल्ली : लैंगिक छळाच्या घटनांत अनेकदा महिला संबंधित व्यक्तींची नावे घेऊन आरोप करण्यापलीकडे काही करीत नाहीत. त्यांनी प्रत्यक्षात अधिकृत तक्रार नोंदवणे अपेक्षित आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाने व्यक्त केले आहे.

लैंगिक छळाच्या प्रकरणातील पीडित महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगासह इतर अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवणे गरजेचे आहे. अशा अनेक प्रकरणांत केवळ नाव घेऊन आरोप करण्यापलीकडे काही केले जात नाही, त्यासाठी अधिकृत तक्रारी दाखल करणे आवश्यक आहे असे सांगून आयोगाने म्हटले आहे, की महिलांच्या खासगी जीवनात अतिक्रमण हे निषेधार्हच आहे. आम्ही माध्यमात अलीकडेच उघड झालेल्या लैंगिक छळाच्या घटनांची दखल घेतली आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. या घटनांमुळे महिलांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होते. यातील गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे.

हॉलिवूडप्रमाणेच भारतातही मीटू चळवळ सुरू झाली असून, अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार २००८ मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केली होती. पाटेकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.  त्यानंतर समाज माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्या लैंगिक छळाचे अनुभव मांडले आहेत. करमणूक व माध्यमांमध्ये लैंगिक छळवणूक होत असल्याचे समोर आले आहे.