पश्चिम उपनगरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा ‘वासनापिसाट’ (सीरियल मोलेस्टर) आता दक्षिण मध्य मुंबईत सक्रिय झाला आहे. सोमवारी वासनापिसाटाने शीव येथे एका १३ वर्षीय शाळकरी मुलीला आपले ‘लक्ष्य’ बनवले.
सोमवारी दुपारी ही शाळकरी मुलगी घरी परतत असताना या इसमाने तिला रस्त्यात अडविले. तुझ्या वडिलांबाबत बोलायचे आहे, असे सांगत तिला वल्लभदास मार्गावरील एका इमारतीच्या आडोशाला नेले. तेथे त्याने तिचा विनयभंग केला. मुलीने प्रतिकार करून आरडाओरड करताच हा वासनापिसाट तेथून पळून गेला. शीव पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात ‘पोक्सो’ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी परिसराचे सीसीटीव्ही तपासले असता पश्चिम उपनगरातील वासनापिसाटानेच हे कृत्य केल्याचे समजले. या वासनापिसाटाने गेल्या दोन महिन्यांत पश्चिम उपनगरातील किमान ८ अल्पवयीन मुलींवर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार केले होते. पोलिसांनी त्याचे रेखाचित्र तयार केले असून त्याचा शोध सुरू असल्याचे शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव गावित यांनी सांगितले.