खारघर मध्ये एका अल्पवयीन मुलावर कलींगड विक्रेत्याने चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तळोजा येथे राहणारा मोहम्मद इस्माइल बोम्बे याचा कलींगड  विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी त्याने जवळच राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाला  मदतीसाठी सोबत नेले होते. रात्री आठच्या सुमारास घरी परत येत असताना, तळोजा उड्डाणपुलाखाली टेम्पो थांबवत या मुलाला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला.
या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीया मुलास  दिली होती. मात्र घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. या प्रकरणी मोहम्मदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीचा काजू, सुपारी जप्त  
नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा येथील पेंधरगाव येथे मारलेल्या छाप्यात ५४ लाख रूपये किंमतीचा काजू आणि सुपारीचा चोरीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे.
 पेंधरगावाजवळील  मोकळ्या जागेत चोरीचा माल असलेला ट्रक उभा असल्याची माहिती माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा मारत ट्रकसह मुस्ताफ अमीर अली मलीक, रज्जाक अब्दुल समजद सैयद आणि सद्दाम सुलतान सैयद यांना ताब्यात घेतले.
किरकोळ वादातून मजूराचा खून
कामोठे येथे एका बांधकाम मजूराचा खून करण्यात आला. सुरवातील शवविच्छेदनााच्या अहवालात नैसर्गिक मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याने अपघाती मृत्यूची नोंदण करण्यात आली होती. मात्र  डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मजुराचा मृत्यू झाल्याचे समोर पुन्हा विच्छेदन केल्यानंतर उघड झाल्याने खुनाचा  गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
नवीन कामोठे उड्डाणपुलाखाली ५ मे रोजी रामबुल साबिन उर्फ अजय याचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी अपघाती मृत्यूची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पालिकेच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र  पोलिसांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.त्या अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  तपासादरम्यान अजय याचे या ठिकाणी सुरक्षा रक्षक असलेल्या विवेक म्हात्रे याच्याशी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. म्हात्रे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हाची कबुली दिली.
अजयबरोबर त्या रात्री भांडण झाल्याने विवेक याने निनाद पाटील, सचिन नवले आणि एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने त्याला बेदम मारहाण केली असल्याची कबुली दिली या संदर्भात कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेरवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.