कुख्यात गुंड छोटा राजनच्या बहिणीच्या नावाने जमीन मालकाला धमकाविणाऱ्या ‘सफायर कॅपिटल’च्या संचालकाला दहिसर पोलिसांनी शनिवारी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. जागेच्या वादातून हे प्रकरण घडले.
विलेपार्ले येथे राहणारे उन्मेष पाटील यांची दहिसरला दोन एकर जागा होती. त्यांनी १९९६ मध्ये त्या जागेचा व्यवहार ‘सफायर कॅपिटल प्रायव्हेट लि.’ या कंपनीबरोबर केला होता. या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
तीन जून रोजी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवून उन्मेष पाटील घरी जात होते. त्याच वेळी सफेद रंगाच्या वॉक्सव्ॉगन गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले आणि ‘या प्रकरणातून माघार घे अन्यथा जीवे ठार मारले जाईल अशी धमकी दिली. हे प्रकरण चेंबूरच्या ‘अक्का’ला दिले असून ती छोटा राजनची बहीण आहे, असेही या आरोपींनी सांगितले. त्यामुळे पाटील यांनी ‘सफायर कॅपिटाल’चे संचालक कमल बगारिया यांच्या विरोधात तक्रार केली होती.  
या प्रकरणाची चौकशी करून शनिवारी दहिसर पोलिसांनी बगारिया यांना अटक केली. बोरिवली न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर मुक्तता झाल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांनी
सांगितले.