गेल्या काही दिवसांपासून थंडी हरवल्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले असून या ढगाळ वातावरणाची आज होणाऱ्या सूर्यग्रहणावर छाया पडली आहे. बुधवारचा संपूर्ण दिवस मळभ आणि धुरकट वातावरणात गेला, तर मुंबईसह पुणे, औरंगाबाद, सातारा भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज असल्यामुळे आज सकाळी होणारे सूर्यग्रहण पाहायला मिळणार का, याकडे खगोलप्रेमींचे डोळे लागले आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यभरात वातावरण ढगाळ झाले आहे. मंगळवारी पुणे, पिंपरी, शहरातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी मुंबई, ठाणे उपनगर आणि नवी मुंबईसह औरंगाबाद, सातारा या भागांत पावसाचा शिडकावा झाला. मुंबई-ठाण्यात नाताळची सुट्टी आणि सण साजरा करणाऱ्या नागरिकांच्या आनंदात पावसाने काहीसा व्यत्यय आणला.

खगोलशास्त्रात सूर्यग्रहणाला मोठे महत्त्व आहे. असाधारण अशा खगोलीय घटनाक्रमामुळे सूर्यग्रहण घडून येते. अतिशय नैसर्गिक अशी ही क्रिया आहे. दक्षिणेतील केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमधून दुर्मीळ असे कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. तर राज्यभरातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ढगाळ हवामान आणि त्यातच पावसाच्या शक्यतेमुळे गुरुवारचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी मुंबईतून सुमारे २०० खगोलप्रेमी उटी येथे गेले आहेत. मात्र बुधवारी दुपारी उटी येथेही पाऊस पडला आहे.

ग्रहणदर्शनाला ग्रहण..

सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी अमावास्येच्या चंद्राने सूर्याला स्पर्श केल्याचे दिसून येईल. त्यामुळे साधारणपणे आठ ते अकरा या वेळेत सूर्यग्रहण पाहता येणार आहे. ही खगोलीय घटना अनुभवण्यासाठी आकाश निरभ्र राहण्याची आकाशप्रेमींची अपेक्षा आहे. मात्र, गुरुवारी गोव्यासह राज्यभरात वातावरण ढगाळ राहण्याचा आणि अत्यल्प स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत हवेची पातळी अतिवाईट

मुंबई : मुंबईत बुधवारी अनेक ठिकाणी हवेची पातळी बिघडल्याचे समोर आले. मालाड, माझगाव, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि अंधेरी या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरावर पोहचला. तर बोरिवली, कुलाबा, भांडुप, चेंबूर आणि नवी मुंबई या ठिकाणी निर्देशांक वाईट स्तरावर होता. मुंबईत बुधवारी कमाल तापमानात दोन अंशांनी घट होऊन ३०.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. तर किमान तापमान २३.५ अंश नोंदविण्यात आले.

ग्रहण कसे पाहाल?

थेट उघडय़ा डोळ्यांनी सूर्याकडे बराच वेळ पाहणे डोळ्यांसाठी हानीकारक ठरते. त्यामुळे सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्यांनी सौर चष्मा, सोलर फिल्टर्स, दुर्बीण यांच्या मदतीनेच ग्रहण पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रणजी सामने उशिराने

मुंबई : सूर्यग्रहणामुळे गुरुवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू होणार आहेत.  सकाळी ११.३० वाजता सामन्यांना सुरुवात होईल.