अभिजात संगीत क्षेत्रात नवे कलाकार निर्माण होत नाहीत, असा तक्रारीचा सूर असतानाच, संगीत शिकणाऱ्यांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस भरच पडत आहे. नव्या दमाच्या अशा दमदार कलावंतांना स्वरमंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘शागीर्द’ या कल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आपल्या सर्जनशील कलेने भारतीय अभिजात संगीत विश्वातील असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या दोन स्वरश्रीमंत कलावंतांच्या शिष्यांची ओळख या स्वरमंचाद्वारे होणार आहे. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या शिष्या तेजश्री आमोणकर आणि जगविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई ‘शागीर्द’च्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या दोन्ही कलावंतांची निवड त्यांच्या गुरूंनीच केली असून २२ जुलै रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते आपली कला सादर करणार आहेत. हाच कार्यक्रम २५ जुलै रोजी ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. दोन्ही दिवशी हा कार्यक्रम सायंकाळी पावणेसात वाजता सुरू होणार असून, तो सर्वासाठी खुला असणार आहे.
नृत्याच्या क्षेत्रात गुरूकडे शिक्षण घेत असलेल्या शिष्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर गुरूच्या अनुमतीनेच त्याला जाहीर कार्यक्रमाद्वारे कलेच्या प्रांगणात पदार्पण करता येते. ‘अरंगेत्रम’ हे त्या परंपरेचे नाव. अभिजात संगीताच्या क्षेत्रात मात्र अशी पद्धत नाही. मात्र ‘लोकसत्ता’ने संगीतातील अशा नव्या कलावंतांना त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने स्वरमंचावर पदार्पण करण्याची संधी देण्याचे ठरवले असून पृथ्वी एडिफिसची प्रस्तुती असलेल्या ‘शागीर्द’ या मालिकेतील हा पहिलाच कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमास या दोन्ही नव्या कलावंतांचे गुरू पंडिता किशोरीताई आमोणकर आणि पंडित शिवकुमार शर्मा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत.