मुंबईच्या इतिहासातील किस्से, कहाण्या आणि रंजक माहिती.. आजच्या संदर्भात सांगणारे नवे सदर.

सध्या सर्वत्र रोकडरहितची-कॅशलेसची- हवा वाहते आहे. वातावरण तर असं आहे की जणू आणखी काही दिवसांनी नोटा आणि नाणी दिसतील ती वस्तुसंग्रहालयातच.

अर्थात तसं काही होणार नाही. या नोटांची आपल्याला एवढी सवय झालीय की त्याविना व्यवहाराचा भीमपराक्रम कोणी करू शकतो हे पटूच शकत नाही. कसं पटणार? गेल्या सुमारे दीडशे वर्षांची सवय आहे ती.

मुंबईत बरोबर १५५ वर्षांपूर्वी, म्हणजे १८६२ साली कागदी नोटांचं आगमन झालं. त्या आधी इथं सर्रास चालत ती नाणी. खणखण वाजणारी. इंग्रज सरकारने थेट ‘विलायते’त छापून इथं नोटा आणल्या, तेव्हा लोक त्यांना म्हणत ‘नोटांची नाणी’.

त्या काळीही सर्वात मोठं चलन होतं हजार रुपयांच्या नोटेचं, हे महत्त्वाचं. इंग्रज सरकारने दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा छापल्या होत्या.

त्या काळी इंग्रजांच्या ताब्यात होते तीन इलाखे. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास. तिथं मिळून अशा तब्बल चार कोटी दहा लाख रुपयांच्या नोटा सरकारने चालू केल्या. या नोटांपासून खऱ्या अर्थानं भारतात कागदी नोटांचं चलन सुरू झालं.

पण त्या आधी नोटा नव्हत्या का? होत्या. पण त्या बँकांच्या असत. तेव्हा बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ हिंदोस्तान अशा बँका होत्या. पण त्या नोटांना सरकारी दर्जा नव्हता. तो आला १८६१च्या पेपर करन्सी कायद्याने.

मुंबईत या नोटा चलनात आल्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी एक पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याचं नाव ‘मुंबईचे वर्णन’. लेखक – गोविंद नारायण माडगावकर. त्या पुस्तकातली या नोटांबद्दलची टिप्पणी मोठी मजेशीर आहे. माडगावकर लिहितात – ‘ह्य (म्हणजे चलनी नोटा) शहाजोग चिटीसारिख्या असून इंग्रज सरकारच्या बावटय़ाखालील सर्वत्र नकद नाण्यासारख्या चालतात.’

कागदाच्या नोटा नकद नाण्यासारख्या चालतात हे आवर्जून सांगावं अशी तेव्हाची परिस्थिती होती. त्याहून मौज अशी की त्यांनी या नोटांना शहाजोग चिठ्ठीची उपमा दिली आहे. शहाजोगचा मराठी व्युत्पत्ती कोशातला अर्थ आहे नावलौकिकाचा.

नोटांचा हा शहाजोगपणा या १५५ वर्षांत नक्कीच हरवला आहे.. अगदी एका दिवसात कागदाचा तुकडा बनून रद्दीत जमा होण्याइतपत हरवला आहे..

मुंबईत, पर्यायाने भारतात कागदी नोटांची सुरुवात झाली १८६२मध्ये. त्यावेळच्या नोटांचा तपशील व चित्रे सध्या अत्यंत दुर्मीळ आहेत. मात्र, त्याच काळातील नोटांची ही छायाचित्रे. नोंदीवरून या नोटा १८६४-६५ या काळातील असाव्यात, असे दिसते. ब्रिटिशकाळातील सुरुवातीच्या नोटा पावतीसारख्या असायच्या. त्यामध्ये रीतसर नोट फाडण्यासाठी छिद्रांची रेषा असायची. कशासाठी? तर पैसे हस्तांतर करताना सुरुवातीला नोट अध्र्यावर फाडून एक भाग पोस्टाने पाठवला जाई. त्याची पोच मिळाली की मग उर्वरित भागदेखील पोस्टाने पाठवण्यात येत असे. अशाच एका अध्र्या नोटेचे चित्रही सोबत आहे.